इंधनाची दरवाढी करुन भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडले : दिगंबर कामत 

0
205
गोवा खबर : गोव्यात २०१२ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने रु. ६० प्रति लिटर पॅट्रोलचे भाव निर्धारीत करण्याचे लोकांना आश्वासन दिले होते. सन २०१४ मध्ये ‘अच्छे दिन”ची स्वप्ने दाखवुन भाजप सरकारने केंद्रात सत्ता संपादन केली. परंतु, केंद्र व राज्य सरकारने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी झालेले असतानाही सातत्याने इंधन दरवाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले व दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला. भाजप सरकार आज कष्टकरी जनतेचा खिसा ओरबाडुन लुटमार करीत आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली.
कोविड महामारीत सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहिर केलेल्या अविचारी देशव्यापी लॉकडाऊन जनता आर्थिक संकटात सापडलेली असताना, असंवेदनशील भाजप सरकार इंधन दरवाढीने त्यांच्यावर अधिक बोजा टाकत आहे. सरकारने ताबडतोब इंधर दरवाढ मागे घ्यावी व लोकांना दिलासा द्यावा असे दिगंबर कामत म्हणाले.
भाजप सरकार कष्टकरी लोकांना आर्थिक सहाय्य देत नाही. मोटर सायकल पायलट, खाजेकार, फुलकार, रेंदेर, पोदेर, मॅकनिक अश्या अनेक पारंपारीक व्यावसायीकांना सरकारने संकट काळात वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप दिगंबर कामत यांनी केला.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या धरणे आंदोलनात भाग घेतला व मोदी सरकारचा निषेध केला. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस तर्फे मोहिद्दीन पॅट्रोल पंप येथे, युवक कॉंग्रेस तर्फे कुराडे पॅंट्रोल पंपावर तसेच मडगाव गट कॉंग्रेस तर्फे विर्जीनकप पॅट्रोल पंपावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, कॉंग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई, दक्षिण गोवा कॉंग्रेसचे दीपक खरंगटे, अविता नाईक, रोयला फर्नांडिस, युवक कॉंग्रेसचे राज्य सचिव ॲड. अर्चित नाईक व दीपक पै, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष उबेद खान, मडगाव गट कॉंग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक हजर होते.
मडगावच्या उप-नगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवीका लता पेडणेकर, दामोदर वरक, सिद्धांत गडेकर, सगुण नायक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर यांनी ही धरणे आंदोलनात भाग घेतला.
भाजप सरकारच्या वाढत्या महागाईने, आज प्रत्येकाचे घरगुती जमा-खर्चाचे गणित कोलमडलेले आहे. गृहिणींना आज गॅस  सिलींडरच्या वाढत्या किमतीने महिन्याचा खर्च सांभाळताना कष्ट सोसावे लागत आहेत. भाजपने लोकांच्या भावनांची दखल घेणे गरजेचे आहे असे दिपाली सावळ यांनी सांगितले.
बेजबाबदार भाजप सरकारने लोकांचे भले करणे सोडुनच दिले आहे. अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी सरकारकडे कसलीच योजना नाही असे कॉंग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई म्हणाले.
आजच्या धरणे आंदोलनात कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपुर्ण राज्यातील सर्व चाळीस मतदार संघात धरणे आंदोलन करुन कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारचा निषेध केला.