इंडो-फ्रान्स गुंतवणूक परिषद ८ रोजी :अनेक क्षेत्रात गुंतवणुकीची शक्यता

0
783

 

 

 

गोवा खबर : इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड  इंडस्ट्री (आयएफसीसीआय) यांनी फ्रान्स वकिलातीच्या सहकार्याने आयोजित केलेली गुंतवणुक परिषद ८ रोजी होणार आहे. यावेळी मुंबईतील फ्रान्स कौन्सुल जनरल सोनिया बार्ब्री १०० फ्रेंच प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षी नागपूर येथे झालेल्या या परिषदेला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीची इंडो – फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह गोव्यात घेतली जात आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये गेली काही वर्षांपासून संरक्षण व एरोस्पेस, शिपींग व लॉजिस्टीक्स व शाश्‍वतता व हरित शहरे

असा विविध क्षेत्रात देवाणघेवाणीचे संबंध आहेत व उभय राष्ट्रांना त्याचा फायदा होत आहे. गोव्यात या व इतर अनेक क्षेत्रात गुंतवणुक करण्यास अनेक फ्रेंच कंपन्या उत्सुक असल्याने फ्रान्स वकिलातीने गोव्यात ही परिषद घेण्याचे ठरवले आहे.

या इंडो – फ्रेंच इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे स्वागत करताना कौन्सुल जनरल सोनिया बार्ब्री यांनी सांगितले की, फ्रान्स गोव्यातील प्रशासनाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे जेणेकरून आम्हाला गोव्यात येता येईल, गुंतवणुक व उत्पादने करता येतील व नवीन काही करण्याची संधी मिळेल.

इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (आयएफसीसीआय) अध्यक्ष सुमित आनंद यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अनेक फ्रेंच कंपन्यांनी गोव्यात काम चालू केलेले असून ते संशोधन व विकास या क्षेत्राबरोबरच उत्पादन क्षेत्रात काम करीत आहेत. आता त्यापुढे जाऊन भारतीय व फ्रेंच कंपन्यांमध्ये देवाण घेवाण करणे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

आयएफसीसीआयचे महासंचालिका पायल कन्वर यांनी परिषदेविषयी सांगितले की, गोव्यात होणाऱ्या या परिषदेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. फ्रेंच कंपन्या भारतात अनेक ठिकाणी गुंतवणुकीचे प्रस्ताव घेऊन आहेत व त्यातील गोवा हे प्रमुख ठिकाण आहे. भारतातील अशा गुंतवणुक पूरक शहरांमध्ये आम्ही या प्रकारच्या परिषदा घेणार आहोत. या परिषदेत ३० हून अधिक फ्रेंच कंपन्यांसह ३५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, ही खचितच आनंदाची गोष्ट आहे.

इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (आयएफसीसीआय) ही संस्था भारतीय व फ्रान्समधील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी व त्यातून उभय देशांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. विना नफा तत्वावर चालणाऱ्या या संस्थेची मुंबई, दिल्ली, चेन्नई व बंगळुरू येथे कार्यालये आहेत आणि ५५० हून अधिक भारतीय व फ्रेंच उद्योग त्यांचे सदस्य आहेत.

८ नोव्हेंबर २०१९ रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक याच्या उपस्थितीत गोव्यात होणाऱ्या २ ऱ्या इंडो फ्रेंच गुंतवणुक परिषदेत मुंबईतील फ्रान्स कौन्सुल जनरल सोनिया बार्ब्री १०० फ्रेंच प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.