इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँकेच्या पणजी आणि मडगाव शाखेचे आज उद्घाटन  

0
1875
गोवा खबर:टपाल खात्यांतर्गत इंडियन पोस्ट पेमेंटस् बँकेच्या देशभरातील शाखांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आज होणार आहे. राज्यातील पणजी आणि मडगाव शाखांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथील कार्यक्रम संपल्यानंतर होणार आहे. पणजी शाखेचे उद्घाटन राज्यपाल  मृदूला सिन्हा यांच्या हस्ते तर मडगाव शाखेचे उद्घाटन दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते होणार आहे. गोवा विभागाचे पोस्ट मास्तर जनरल डॉ एन. विनोदकुमार यांनी आज पणजी येथील पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी गोवा विभागाच्या वरिष्ठ टपाल अधिक्षक  अर्चना गोपीनाथ, पणजी शाखेचे व्यवस्थापक चेतनकुमार, म्हापसा शाखेचे व्यवस्थापक राकेश ओपी यांची उपस्थिती होती.गोव्यात आता पर्यंत 2 हजार लोकांनी या बँकेत खाती उघड़ली आहेत.
देशभरात सुरूवातीला   650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पॉईटस यांच्‍या माध्‍यमातून 1 सप्‍टेंबर 2018 पासून आय.पी.पी.बी. च्‍या सुविधा सुरू होतील तर 31 डिसेंबर पर्यंत उर्वरित सुमारे 1.55 लाख अॅक्‍सेस पॉईटस कार्यरत होतील. राज्यात सुरुवातील पणजी आणि मडगाव या दोन शाखा आणि 10 अॅक्‍सेस पॉईंटस असतील. तर, डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व 257 टपाल कार्यालये अॅक्‍सेस पॉईंट म्हणून कार्य करतील. टपाल विभागाच्या इतिहासात इंडियन पोस्ट पेमेंटस् बँक हा मैलाचा दगड ठरणार असल्याचे डॉ. एन. विनोदकुमार म्हणाले.
राज्यात 797 पोस्टमन आणि 3703 ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरपोच सेवा दिली जाणार आहे. यात प्रत्येक पोस्टमनकडे स्मार्टफोन, बायोमेट्रीक उपकरण, क्यू आर कार्ड असेल. सुरुवातीला पणजी शाखेअंतर्गत साईपेम, पेन्हा-दी-फ्रान्स, गोवा विद्यापीठ, बांबोळी संकूल, पणजी मुख्यालय, तर मडगाव शाखेअंतर्गत माकानेझ, कोळा, द्रामपूर, केळशी, मडगाव  मुख्यालय  या शाखांमध्ये अॅक्‍सेस पॉईंट असतील.
आतापर्यंत बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी सहज, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक निर्माण करणे हे इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेचे उद्दिष्ट आहे. बचत खाते, चालू खाते, पैसे पाठवणे आणि हस्तांतरीत करणे, शासकीय अनुदानित योजनांद्वारा मिळणारे लाभ, सर्व प्रकारची देयके आणि उपयोगिता देयके,  उद्योग आणि व्यापारी देयके अशा अनेक प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेद्वारे उपलब्ध होणार आहे.  या सर्व सेवा आणि उत्पादने बँकेच्या उत्तम दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या विविध माध्यमाद्वारे (काऊंटर सेवा,मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन, एस.एम.एस आणि आय.व्ही.आर) प्रदान केल्या जातील.
इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेच्या सहाय्याने बँकिंग आणि देयके भरणे सोपे होईल. आधार कार्ड आणि पॅनकार्डचा उपयोग करुन अगदी काही मिनिटातच कोणत्याही कागदपत्रांशिवाय हे खाते उघडले जाऊ शकेल आणि ग्राहकांना क्यु आर कार्ड आणि बायोमेट्रीक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे असे डॉ एन. विनोदकुमार यांनी यावेळी सांगितले.