पणजी : पणजीत होणार्‍या ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागासाठी एकूण ४२ चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यात तब्बल 11 मराठी सिनेमांना स्थान मिळाले आहे.अलिकडच्या काही वर्षात इफ्फी मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी सिनेमांची संख्या आणि दर्जा देखील वाढत आहे.
यंदा इंडियन पॅनोरमामध्ये २६ फिचर, तर १६ नॉन फिचर चित्रपट आहेत. गोमंतकीय दिग्दर्शक मिरांशा नाईक यांच्या कोकणीतील ‘जुझे’ या एकमेव सिनेमाची निवड झाली आहे.
नॉन फिचर गटात १६, तर फिचर फिल्म गटातील २६ चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. फिचर फिल्म्स गटात मराठी भाषेतील ९ चित्रपट, हिंदी ६, बंगाली ३, आसामी २, तसेच कोकणी, तामिळ, मल्याळी, तेलगू, ओरिया व कन्नड भाषांतील प्रत्येकी एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. नॉन फिचर गटात हिंदी ३, बंगाली ३, मराठी २, मल्याळी २, इंग्रजी ३, तसेच अपतानी, हरयाणवी व संताली भाषेतील प्रत्येकी एका चित्रपटाचा समावेश आहे.
दिग्दर्शक, कलाकार व लेखक सुजय घोष यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने
१५३ फिचर चित्रपटांतून २६ चित्रपटांची निवड केली. त्यामध्ये पिहू (हिंदी), क्षितीज ए हॉरीझॉन (मराठी), मुरांबा (मराठी), रेल्वे चिल्ड्रन (कन्नड), न्यूटन (हिंदी), पिंपळ (मराठी), व्हिलेज रॉकस्टॉर झोल (बंगाली), बिसर्जोन
(बंगाली), टेक ऑफ (मल्याळी), रेडू (मराठी), रुख (हिंदी), कडवी हवा (हिंदी), इदाक (मराठी), ख्यानिका (ओरिया), कासव (मराठी), जॉली एलएलबी २ (हिंदी), बाहुबली २ : द कन्क्लूजन (तेलगू), व्हेंटिलेटर (मराठी), पूर्णा (हिंदी), मेघनाद बोध रहस्य (बंगाली) या फिचर चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पिहू’ या चित्रपटाने फिचर चित्रपट विभागाचा आरंभ होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘कासव’चाही समावेश आहे.

चित्रपट दिग्दर्शक व लेखल सुधीर मिश्र यांच्या अध्यक्षेतेखालील परीक्षक मंडळाने
१५४ नॉनफिचर चित्रपटांतून १६ चित्रपटांची ​निवड केली.
 त्यामध्ये पुष्कर पुरान (हिंदी), अाबा (अपातनी), दुग्गा (बंगाली) आणि ग्रॅडपॅरेन्ट्स होम (बंगाली), पलाश (बंगाली), ए वेरी ओल्ड मॅन विथ इनॉर्मस विंग्स (इंग्रजी), द वॉटर फॉल (इंग्रजी), अम्मा मेरी (हरियाणी), नेम, प्लेस अनिमल, थिंग (हिंदी), च्यूटनी (हिंदी), लाईफ अँड फिल्म ऑन केजी जॉर्ज (मल्याळी), ​​जी (मल्याळी), बलुता (मराठी), खिडकी (मराठी), इपील (संताली), फायर फ्लाईस इन द एबीस (इंग्रजी) या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
इंडियन पॅनोरमामध्ये मराठी चित्रपटांचे वर्चस्व
​इंडियन पॅनोरमा विभागात यंदाही मराठी चित्रपटांचे वर्चस्व आहे. मराठीच्या एकूण ११ चित्रपटांची निवड झाली असून नॉन फिचरमध्ये २, तर फिचर चित्रपट विभागात तब्बल ९ चित्रपटांची निवड झाली आहे. यामुळे यंदाच्या इफ्फीत रसिकांना मराठी चित्रपटांचा अस्वाद घेण्याची संधी प्राप्त झाली आहे