इंडिगोच्या इंजिनाला आग;विजमंत्री काब्राल थोडक्यात बचावले

0
825
 गोवा खबर:पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्ली येथे निघालेले वीजमंत्री नीलेश काब्राल आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले.विमान हवेत असताना डाव्या इंजिनाने पेट घेतल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडींग करावे लागले.
रविवारी रात्री 10 वाजुन 20 मिनिटांनी इंडिगोच्या 6E336 या विमानाने वीजमंत्री नीलेश काब्राल, कृषी खात्याचे संचालक महादेव केळेकर,गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सायमन डिसोझा हे पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यां सोबत असलेल्या बैठकीसाठी दिल्ली येथे निघाले होते.
विमानाने उड्डाण केल्या नंतर काही वेळाने डाव्या बाजूच्या इंजिनाने पेट घेतला.इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच पायलटने डाव्या बाजूचे इंजिन बंद करून विमान पुन्हा दाबोळी विमानतळाच्या दिशेने वळवून रात्री 11.30च्या सुमारास विमानाचे इमर्जन्सी लँडींग केले.
वीजमंत्री काब्राल यांनी अशी घटना घडली याला दुजोरा देतानाच आम्ही सुखरूपपणे इमर्जन्सी लँडींग केले.मी देवाचे आभार मानतो त्याने आम्हा सर्व प्रवशांना सुखरूप ठेवले.
या घटने नंतर वीजमंत्री काब्राल आणि त्यांची टीम मध्यरात्री 12.50 च्या दुसऱ्या विमानाने दिल्लीस रवाना झाले.