इंट्रानेट ऑप्टिक फायबर नेटवर्क ॲानलाईन शिक्षणासाठी त्वरित कार्यांवित करा : दिगंबर कामत

0
407
गोवा खबर:ॲानलाईन शिक्षणासाठी लागणारा मोबाईल दुरूस्तीसाठी पैसे न मिळाल्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय सत्तरी तालुक्यातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला हे अत्यंत दुर्देवी आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात पोचलेली इंट्रानेट सुविधा त्वरित कार्यांवीत करावी जेणेकरुन ॲानलाईन शिक्षणाचे सर्व अडथळे दूर होतील व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केलीआहे. 
आज मोबाईल दुरूस्तीसाठी पैसे नसल्याने आपले जीवन संपवण्याचा त्या विद्यार्थ्याचा निर्णय धक्कादायक आहे. त्याच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत . विद्यार्थ्यानी दबावाखाली न येता आपल्या समस्या व प्रश्न पालक तसेच शिक्षकांकडे मांडावेत. प्रत्येत समस्या सोडवीता येते व जीवनाचा अंत करणे हे नक्कीच बरोबर नव्हे असे कामत यांनी म्हटले आहे.
आज इंट्रानेट सुविधा प्रत्येक पंचायती पर्यंत पोचली आहे. स्थानीक केबल ॲापरेटर हे जाळे प्रत्येक घरातील दूरदर्शन संच वा संगणकाला जोडू शकतो. गोवा ब्राॅडबॅंड नेटवर्क हेच ॲानलाईन शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे याचा कामत यानी पुनरूच्चार केला आहे
ॲाप्टिक फायबर केबल नटवर्क अखंडित व प्रभावी  नेटवर्क देऊ शकते. गोव्यात इंट्रानेट सुविधेचे जाळे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यानी आपण मुख्यमंत्री असताना गोव्याला भेट दिलेल्या जिबिबीएन सेवेने  जोडले आहे असे सांगुन, कामत यांनी गोवा विद्यापीठाने हल्लीच तयार केलेल्या अहवालात ऑप्टीक फायबर केबल नेटवर्क सुविधाच प्रभावी असल्याचे म्हटले आहे याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई-अंदमान निकोबार बेटांना जोडणाऱ्या भूमिगत ऑप्टीक फायबर नेटवर्कचे हल्लीच उद्घाटन केल्याचे सांगुन, त्यामुळे दूरसंचार व नेटवर्क क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे कामत यांनी नमुद केले आहे.
इंट्रानेट सेवेचा योग्य उपयोग सरकारने करणे गरजेचे आहे. त्यामुळे डिटीएच सेवेमुळे मंदित असलेल्या स्थानिक केबल ॲापरेटर्सना रोजगाराची संधी मिळेल तसेच महागडे स्मार्टफोन घेण्याचे पालकांवरचे ओझे कमी होईल. मोबाईल संचाला पर्याय इंट्रानेट सेवेत उपलब्ध असुन, स्थानिक केबल ॲापरेटर प्रत्येक घरातील दूरदर्शन संच वा संगणकाला जोडणी देऊन ॲानलाईन शिक्षण घराघरात पोचवु शकतात. यामुळे विद्यार्थ्यांकडुन मोबाईलचा दुरूपयोग ही  होणार नाही असा दावा कामत यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यानी ताबडतोब इंट्रानेट सुविधा पुर्णपणे कार्यांवित करण्यावर भर देणे गरजेचे आहे,असे सांगून कामत म्हणाले, सरकारने मोबाईल टाॅवरपेक्षा या सुविधेलाच प्राथमिकता देणे महत्वाचे आहे जेणेकरुन विद्यार्थी  व पालकांच्या समस्या कमी होतील व सत्तरी सारखी  दुर्देवी घटना परत घडणार नाहीत.