‘इंटरडिपेंडन्स’मध्ये हवामान बदलाच्या भावनात्मक प्रभावावर भाष्य-नीला माधव पांडा

0
403

इफ्फीच्या ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे दिग्दर्शक भेटीला

‘ओरे’मध्ये वैयक्तीक आणि सांस्कृतिक ओळखीचा शोध – मेहमत अकीफ बायुकातले

 

 

 

 गोवा खबर:चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. मनाला स्पर्श करणारं, संदेश देणारं आणि सामाजिक बदल घडवण्याचे सामर्थ्यही चित्रपटात आहे. 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दाखविण्यात येणाऱ्या ‘ओरे’ आणि ‘इंटरडिपेंडन्स’ या दोन आंतरराष्ट्रीय चित्रपटातही हाच भाव प्रतीत आहे.

‘ओरे’ हा चित्रपट म्हणजे वैयक्तिक आणि सांस्कृतिक ओळखीचा शोध असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहमत अकीफ बायुकातले यांनी यावेळी सांगितले.

 

पदार्पणातला हा चित्रपट निर्माण करताना आलेल्या समस्यांविषयी बोलताना सर्वात मोठा कठीण भाग म्हणजे चित्रपटासाठी वित्तीय पाठबळ मिळवणे हा होता असे ते म्हणाले. जर्मनीमध्ये तूर्क मूळ असलेले अभिनेते शोधणे कठीण होते कारण बरेचसे तूर्क अभिनेते टेलिव्हिजनसाठी काम करतात. त्यामुळे अभिनेते शोधण्यासाठी सुमारे एक वर्ष लागल्याचे त्यांनी सांगितले.

‘इंटरडिपेंडन्स’ हा चित्रपट हवामान बदलाच्या भावनात्मक प्रभावाविषयी भाष्य करत असल्याचे या चित्रपटाच्या अकरा दिग्दर्शकांपैकी एक नीला पांडा यांनी सांगितले.

दिल्ली शहराला ग्रासणाऱ्या तीव्र वायू प्रदूषणामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या दिल्लीतल्या कुटुंबाची कथा यात मांडण्यात आली आहे. या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने संवाद निर्माण व्हावा हा या चित्रपटाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

वायू प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि अनेक संस्था प्रयत्नशील असल्या तरी दिल्लीतल्या जनतेनेही याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. हवामान बदल हा जनतेतल्या संबंधावर कसा परिणाम घडवत आहे याबाबतचे व्यक्तीगत अनुभवही त्यांनी सांगितले.

पूर्वपिठीका

जर्मन-तुर्कीश दिग्दर्शक मेहमत अकीफ बायुकातले यांचा ‘ओरे’ हा चित्रपट तिवार तलाक या विषयाभोवती फिरतो. या चित्रपटातले प्रमुख पात्र उत्तम मुस्लीम आणि उत्तम पती होण्याचे स्वप्न बाळगतो मात्र पत्नीशी विवाद घालताना तो छिन्नभिन्न होतो. नव्या मुस्लीम समुदायात आपले आयुष्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न हे पात्र करते मात्र श्रद्धा, वास्तव आणि स्वत:ची ओळख यात त्याची सातत्याने होरपळ होते.

बर्लिन इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2019 मध्ये दाखविण्यात आलेल्या या चित्रपटाला बेस्ट फर्स्ट फिचर ॲवार्डने गौरवण्यात आले. 2019 मध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी मेडल पुरस्कारासाठीही हा चित्रपट स्पर्धेत आहे.

‘इंटरडिपेंडन्स’

जागतिक किर्तीच्या अकरा चित्रपट निर्मात्यांनी बनवलेला हा आगळा चित्रपट मानवी समाज आणि नैसर्गिक वातावरण यांच्यातल्या नात्याची गुंफण आणि त्यावर हवामान बदलाचा विविध मितीतून होणारा परिणाम आणि त्यावरचा तोडगा सुचवतो.

अकरा दिग्दर्शकांपैकी एक असलेले नीला पांडा यांनी हवामान बदल, बाल मजुरी, पाणी प्रश्न यासारख्या महत्वाच्या अनेक सामाजिक मुद्यांवर 70 चित्रपट, माहितीपट, लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांची पहिली फिचर फिल्म ‘आय ॲम कलाम’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह तब्बल 34 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर दुसरी फिचर फिल्म जलपरीला कान्स इथे एमआयपी ज्युनियर पुरस्कार मिळाला.