आला रे आला मान्सून आला

0
1083
गोवा खबर:दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडयात केरळ, कर्नाटक मार्गे गोव्यात येणारा मान्सून यंदा तब्बल 2 आठवडयानंतर गोव्यात दाखल झाला आहे.गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी गोव्यात मान्सून दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
गोव्यात आज दाखल झालेल्या मान्सूनने आपली वाटचाल कायम राखत महाराष्ट्रा मधील रत्नागिरी आणि कोल्हापुरचा टप्पा ओलांडला आहे.येत्या पाच दिवसात गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल,अशी शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील वेधशाळेने दिला आहे.
दरवर्षी जूनच्या 7 तारखे पर्यंत गोव्यात येणारा मान्सून यंदा अंदमानातून केरळ मार्गे रखडत रखडत 14 जून रोजी मेंगलोर मध्ये दाखल झाला.दरम्यानच्या काळात आलेल्या वायू चक्रीवादळाने मान्सूनच्या पुढे सरकण्यासाठी तयार झालेले पोषक वातावरण विस्कटून टाकले होते.वातावरणातील आद्रता वायू सोबत निघुन गेल्याने मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर पडले होते.काल पासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मेंगलोर मध्ये 6 दिवस रेंगाळलेल्या  मान्सूनचे आज गोव्यात आगमन झाले.
मान्सून दोन आठवडे उशिरा दाखल झाला असला तरी उर्वरित दिवसात पाऊस दरवर्षीची सरासरी भरून काढील, अशी शक्यता वेधशाळेचे संचालक डॉ. पडगलवार यांनी व्यक्त केली आहे.गेल्या 20 वर्षात प्रथमच मान्सूनच्या आगमनास इतका विलंब झाला असल्याचे पडगलवार यांनी यावेळी सांगितले.