मार्च महीना सुरु झाल्यापासून उकड्याचा पारा वाढू लागला आहे.अवकाळी पावसाने वातावरण पार बिघडवून टाकले आहे.व्हायरल इंफेक्शनसाठी पोषक वातावरण असून डॉक्टर मंडळींसाठी सुगीचे दिवस ठरणार आहे.या गोष्टी आता अंगवळणी पडू लागल्या आहेत.वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाच चक्र पूर्णपणे बिघडून गेले आहे.सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांच्या परीक्षा संपल्या संपल्या हवा पालट करून ताजे तवाने व्हायचा विचार असेल तर हिमाचल प्रदेश मनात पक्का करून बॅग भरायला लागा.
हिमाचल प्रमाणे काश्मिर देखील सुंदर आणि थंडगार आहे मात्र दहशतवादी कारवायांमुळे केव्हा काय होईल याचा नेम नसतो.उगाच जीव धोक्यात घालण्यापेक्षा जीवाचा हिमाचल केलेले केव्हाही चांगला.
कसे जाल हिमाचलला

गोव्या पासून 2 हजार 337 किमी अंतरावर असलेल्या हिमाचल प्रदेशला रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे जाता येत.रस्ता प्रवास एडवेंचर्स प्रेमींसाठी चांगला पर्याय आहे.मात्र 40 तास प्रवासात घालवण्या इतके पेशन्स फारच कमी लोकांकडे असतील.रेल्वे प्रवास सुद्धा 35 ते 36 तासांचा आहे.योग्य नियोजन असेल तर तीन महीने अगोदर विमान तिकीट काढले तर ते अपेक्षे पेक्षा स्वस्त आणि कमी वेळेत प्रवास संपवणारे ठरते.हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी चंडीगड, दिल्ली बरोबर धर्मशाला जवळ कांगरा,कुलू जवळील कुलू(भुंतर) आणि शिमला विमानतळ हे पर्याय आहेत.हिमाचल प्रदेश मधील विमानतळ छोटे आहेत.तेथे छोटी विमाने जातात.त्यामुळे थेटपणे जायचे असल्यास तिकीट दर 10 हजारच्या वरतीच असतो.त्या तुलनेत दिल्ली आणि चंदीगड हे पर्याय स्वस्त आहेत.दिल्ली पर्यंत 3 ते साडे 3 हजार रूपयांत जाऊन तेथून वॉल्वो बसेस किंवा कार भाड्याने घेऊन 10 ते 12 तासत हिमाचल गाठता येत.व्होल्वो तिकीट जेमतेम हजार रुपये असत. कारसाठी मात्र कारच्या प्रकारा नुसार दर ठरलेले असतात.काही कंपन्या ऑनलाइनच्या माध्यमातून कार बुकिंगची व्यवस्था उपलब्ध करून देतात.9 ते 18 रुपये किलोमीटर दराने कार उपलब्ध होते.कार मधून जाताना निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तर घेता येतो शिवाय मनाला वाटेल तिथे थोड़ा वेळ थांबुन जाता येते.
चंदीगड ते मनाली बस प्रवास
चंदीगड येथून सुद्धा बस आणि कार असे दोन पर्याय आहेत.चंडीगढ़ विमानतळा पासून अर्ध्या तास अंतरावर सेक्टर 43 आहे.तेथून व्होल्वो बसेस सूटतात.हिमाचल परिवहन किंवा खाजगी बसेसचे बुकिंग ऑनलाइन करता येते.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुका संपताच आम्ही हिमाचल गाठल होत. गेल्यावर्षी 8 दिवस शिमला,कुलू ,मनालीत 8 दिवस मुक्काम करून देखील स्नो फॉल काही केल्या बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे यंदा स्नो फॉल बघता येईल इतके दिवस मूक्काम करायचा ठरवून 3 महीने अगोदर ऑनलाइन बुकिंग आणि शोधा शोध सुरु केली होती.
हिमाचल मधील विमानतळांवर उतरणारी विमाने छोटी असल्याने त्याचे तिकीट दर जास्त असतात त्यामुळे दिल्ली किंवा चंडीगढ़ असे दोनच पर्याय शिल्लक होते.जाताना चंडीगढ़चा पर्याय निवडला. पूरेसे अगोदर तिकीट काढल्याने बजेट मध्ये मिळाले. चंडीगढ़ मधून शेअर टॅक्सीसाठी ऑनलाइन शोधा शोध केली पण ऑफ सिझन असल्याने मनाली कडे जाणारे फार पर्यटक नसल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जिथे 5 ते 6 हजार रुपये जाणार होते तिथे 700 रूपयांचा वोल्व्हो बसचा पर्याय सापडला. हिमाचल प्रदेशची सरकारी वोल्व्हो बस सेवा आहे.त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येते.मी फ्लाइट 10.30पोचणार असल्याने 12 ची बस बुक केली. मात्र फ्लाइट लेट झाले.सामान घेऊन बाहेर पडे पर्यंत पावणे बारा वाजले.बसच्या कंट्रोल रूमला फोन करून 10 मिनीट थांबण्याची विनंती केली आणि विमानतळा बाहेरची कार करून सेक्टर 43 गाठले. साधारण 25 मिनिटे लागतात ट्रैफिक मधून पण ड्रायव्हरने शार्टकट मारून 12.10 ला बस स्टैंडवर सोडले.5 मिनीट उशीर झाला असता तर 700 रुपये फुकट गेले असते शिवाय 2 वाजे पर्यंत दुसऱ्या बसची प्रतीक्षा करत बसावे लागले असते.जेवढया उशिरा निघणार तेवढ्या उशिरा पोचणार हे ठरलेले.
कंटाळवाणा बसचा प्रवास
दुपारी 12 वाजता सुरु झालेला बस प्रवास रात्री साडे अकरा वाजता संपला. दुपारी मोहाली आणि संध्याकाळी मंडी मध्ये हॉल्ट घेऊन बस एकदाची मनाली मध्ये पोचली. गोव्याच्या हवामाना मधून आलो असल्याने अंगावर गरम कपडे नव्हते.सगळे गरम कपड़े बॅगेत आणि बॅग बसच्या खालच्या डिकित. त्यामुळे कुडकुडत बस मधून बाहेर पडून हॉटेल गाठे पर्यंत काही खर नव्हतं.ऑटो वाला घेऊन हॉटेल गाठल. इतकी हॉटेल झालीत मनाली मध्ये की ऑटोवाल्यांना रस्ते आठवणीत ठेवणे अवघड होऊ लागले.गूगल मॅप वरुन रस्ता दाखवत पावणे बाराच्या सुमारास हॉटेल गाठले.
कडाक्याची थंडी; अंथरुण सुद्धा पडते अपूरे
ज्या ज्यूपिटर नावाच्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तेथे हॉट बेड होता.टॉवर हीटर नव्हता. टॉवर हीटर स्वंतंत्र घ्यावा लागतो.त्यासाठी दिवसाला 300 रुपये मोजावे लागतात.मला वाटल हॉट बेड आहे काम भागेल पण कसले काय मायनस 4 मध्ये काय पूरेनास झाल होत. अंगावर 2/2ब्लेंकेट घेऊन रूम मध्ये मागवलेल जेवण जेवलो.थोड़ी गर्मी येईल म्हणून खास गोव्यातून सोबत आणलेली व्हिस्कीचा पेग बनवला.मायनस 4 पर्यंत उतरलेल्या पाऱ्यात तो पेग कूचकामी ठरला.खर्च वाढवायचा नसल्याने टॉवर हीटर काही मागवला नाही.हॉट बेडवर कशी बशी रात्र काढली.हॉट बेड म्हणजे गादीला लाइटच्या माध्यमातून गरम केले जाते.त्यामुळे कडक्याच्या थंडी मध्ये देखील झोपणे सुसह्य होते.तसे ते झाले.मात्र खरी कसोटी होती ती सकाळी…

आंघोळ करणे साहसी….
-10 पर्यंत पारा खाली घसरलेला असताना कपडे काढून आंघोळ करण्यासाठी शेर दिल माणूस हवा.थंडी तर हा म्हणत असते.अंगावर चढवलेले कपड़े जसे उतरवू तशी हुडहुडी आणखीनच वाढत जाते.हीटर मधून कडक पाणी अंगावर पडे पर्यंतचा प्रत्येक क्षण आठवणीत राहिल असा असतो.कशी बशी कावळ्या चिमणीची आंघोळ आटोपुन बाहेर येऊन कपड़े अंगावर चढवले कि जीव भांड्यात पडतो.आंघोळ करताना गरम पाण्याच्या वाफेन बाथरूम मध्ये धुक साठत काही वेळा तर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो.अशा वेळी एकझोस्ट फॅन सुरु ठेवणे कधीही शहाणपणाचे.

आणि बर्फाचा पाऊस अनुभवला..
यावेळी मनाली ट्रिप सार्थकी ठरली ती 3 दिवस अनुभवलेल्या स्नो फॉल अर्थात बर्फाच्या पावसामुळे.सकाळी 8 ची वेळ.गाढ झोपेत असताना रिसेप्शन वरुन फोन आला…सरजी स्नो फॉल शुरू हो गयी। कसलाच विचार न करता बेडवर उठून बसलो.ब्रश सुद्धा केल नाही.गरम पाण्याने चुळ भरून जीन्स पँट चढवून रिसेप्शनवर गेलो.मला तुमच्या हॉटेलच्या कारने कोणी मॉल रोडवर सोडेल का विचारल तर उत्तर नाही आल. दुसरा पर्याय रिक्शावाला तो सुद्धा चढण चढून हॉटेल पर्यंत यायला तयार नव्हता. मग काय हॉटेल सीगुल पासून मॉल रोड चालत 5 मिनीटांवर आहे.सरळ चालत निघालो.नुकतीच बारीक पावसाला सुरुवात झाली होती.बघता बघता कापूस पिंजून उडवतात तसा बर्फाचा पाऊस सुरु झाला.हळू हळू त्याची घनता वाढत केली. नंतर तर कॅमेऱ्या मध्ये सुद्धा कैद होईल असा स्नो फॉल सुरु झाला.अगदी संध्याकाळ पर्यंत बर्फवृष्टी सुरु होती.डोंगर पांढरे शुभ्र झाले,झाड़ हिरव्याची पांढरी झाली.रस्त्यांवर बर्फाचा गालीचा पसरला गेला.बर्फाचा थर वाढत गेला तस त्यावरून चालण अवघड बनत गेल. थंडी तर इतकी की विचरता सोय नाही.एका तासात 10 वेळा चहा पिऊन स्वतःला गरम करावे लागत होते.अगदी मन भरे पर्यंत बर्फाच्या पावसात भिजुन संध्याकाळी हॉटेलवर पोचलो.किती तरी व्हिडिओ केले,फेसबुक वरुन लाइव्ह केल,एबीपीसाठी एक बातमी करून कर्तव्य देखील पार पाडल.अगदी जीवाची मनाली केली.
ज्याची प्रतीक्षा होती तो स्नो फॉल सुरु झाल्या नंतर हिमाचलच्या इतर भागात जाण्याचा बेत रद्द करून मनाली मध्ये बर्फातून भटकंती केली.
ऑफ सिझन मध्ये खरी मजा

ऑफ सिझन मध्ये मनाली आणि हिमाचल मध्ये अजीबात गर्दी नसते.हॉटेलचे दर सुद्धा एकदम कमी असतात.कडाक्याची थंडी असल्याने फारसे कोणी तिकडे फिरकत नाहीत.स्नो फॉल एन्जॉय करणारे मात्र आवर्जून हजेरी लावतात.हॉटेलसाठी हा सिझन स्लैक असतो.मी जेव्हा चिकन बिर्याणीची ऑर्डर द्यायचो तेव्हा हॉटेलचा शेफ चिकन आणायला कोणाला तरी मार्केट मध्ये पाठवायचा.चिकनची ऑर्डर नसेल तर ऐन वेळी काही तरी मिळणारे व्हेज खावून वेळ मारून नेणे किंवा मॉल रोडवर जाऊन पोटपूजा करून येणे हा एकमेव पर्याय शिल्लक उरतो.
मनालीहून दिल्लीत परतीचा प्रवास 
10 दिवस मनालीची थंडी,स्नो फॉल एन्जॉय करून परतीसाठी दिल्लीला निघालो.हॉटेल सिगुलचे मालक लामा इतक्यात खास दोस्त बनले होते.त्यांनी फक्त 2 हजार रुपये घेऊन सगळा पाहुणचार केला शिवाय मनाली वरुन दिल्लीला जाणारी व्होल्वो बस बुक करून दिली. तब्बल 14 तास प्रवास करून दिल्ली गाठली.मनालीच्या स्वच्छ हवेतून दिल्लीच्या प्रदूषित हवेत प्रवेश करताच दम घुसमटायला लागला.विचार होता गोवा सदन किंवा गोवा निवास मध्ये मुक्काम करण्याचा पण राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आग्रह करून आपल्या फ्लैट वर थांबण्याची सोय केली. एक दिवस दिल्लीत मुक्काम करून विमान मार्गे गोवा गाठला.दिल्लीत फिरताना ओला किंवा उबर ऍप वापरले त्यामुळे बरीच बचत झाली.गोव्यात उतरून तरतरीत होऊन पुन्हा कामास लागलो…