आर्सेनीक अल्बम ३० चे दु्ष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी आयुष मंत्री व मुख्यमंत्री घेणार का : चोडणकर यांचा सवाल

0
319
गोवा खबर:गोवा सरकार सध्या निवडक मतदारसंघात  वाटत असलेल्या आर्सेनीक अल्बम ३० गोळ्यांच्या सेवनाने लोकांच्या आरोग्यावर त्याचे विपरित व दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी केंद्रिय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत घेणार का असा प्रश्न गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी विचारला आहे. 

केंद्रिय आयुष मंत्रालयाने कोविड रोग्यांवर वापरण्यात येणाऱ्या औषधांची जाहिरतबाजी करु नये असे निर्देश दिलेले असताना ही गोवा सरकार अवघ्याच काही मतदारसंघात सदर गोळ्यांचे वाटप करीत आहे. सरकारने सदर गोळ्यांच्या सेवना बद्दल वैज्ञानीक आधाराची  माहिती लोकांसमोर ठेवणे गरजेचे आहे,असे चोडणकर म्हणाले.
ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्लस यांच्यावर आयुर्वेदीक उपचार केल्याने ते कोविड आजारातुन बरे झाले असा  केंद्रिय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा दावा ब्रिटनच्या राजघराण्याच्या कार्यालयाने  फेटाळल्याने संपुर्ण गोव्याला लाजेने मान खाली घालावी लागली होती याची आठवण  चोडणकर यानी करुन दिली आहे.
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आयुष मंत्र्यानी यापुर्वी कोविड रुग्णाना आयुर्वेदिक उपचाराने बरे करण्यात आले असा दावा केला होता. सदर दाव्याला वैज्ञानिक आधाराने सिद्ध करावे अशी मागणी काॅंग्रेस पक्षाने केली होती, परंतु आज पर्यंत सरकारने त्यावर तोंड उघडलेले नाही असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यानी म्हटले आहे.
आज सरकारच्या कोविड हाताळणी बद्दल सामान्य जनतेत संपुर्ण अविश्वासाचे वातावरण आहे. सरकारने निवडक मतदारसंघात आर्सेनीक गोळ्यांचे वाटप करुन त्यात भर घातली आहे.
लोकांनी आपले फॅमिली डाॅक्टर व तज्ञाचा सल्ला घेऊनच सदर गोळ्यांचे सेवन करावे व आपल्या आरोग्याची संपुर्ण काळजी घ्यावी असे   चोडणकर यानी म्हटले आहे.