आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी शिरोडकर?

0
1523
गोवा खबर:आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदा वरुन पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आज राजीनामा दिला.आता या पदावर काँग्रेसची आमदारकी सोडून भाजपवासी झालेल्या शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांची वर्णी लागणार आहे.
भाजप आघाडी सरकारला अनेक प्रश्नांवर घेरत आक्रमक भूमिका घेतलेल्या काँग्रेसच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजपने काँग्रेसचे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांना भाजप मध्ये आणले आहे.दोन्ही आमदारांना भाजप मध्ये आणण्यासाठी पक्षाने एकही पैसा खर्च केला नाही असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला होता.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अलीकडेच आजारी असलेल्या पांडूरंग मडकईकर आणि फ्रांसिस दिसोझा यांना मंत्रीमंडळातून वगळून त्यांच्या जागी नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक यांची वर्णी लावली होती.सध्या मंत्रीमंडळातील एकही जागा रिक्त नाही आणि मंत्रीमंडळातून कोणाला वगळून सोपटे आणि शिरोडकर यांना मंत्री करण्याची शक्यता फारच धूसर असल्याने दोघांची वजनदार महामंडळावर वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
शिरोडकर यांची सोय करण्यासाठी कुंकळ्येकर आणि आर्थिक विकास महामंडळाचा राजीनामा दिल्याने शिरोडकर येत्या एक दोन दिवसात आपल्या नव्या पदाची धुरा स्वीकारण्याची शक्यता आहे.
सोपटे यांच्याकडे पर्यटन विकास महामंडळ?
सोपटे यांची पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.नीलेश काब्राल सध्या पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.त्यांची वीजमंत्री वर्णी लागल्याने त्यांच्याकडे असलेल्या पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद सोपटे यांच्याकडे दिले जाणार आहे.