आरोग्यमंत्री राणे यांनी सत्य, पारदर्शकता आणि चाचण्यांविषयी उत्तर द्यावे :आम आदमी पक्ष

0
464
गोवा खबर:आम आदमी पक्षाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना कोरोनावरून पुन्हा एकदा लक्ष्य करताना राणे यांनी इंग्रजीतील “टी” अक्षरावरून येणाऱ्या तीन शब्दांविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. हे तीन “टी ” म्हणजे “ट्रूथ ” (सत्य ), “ट्रान्स्परन्सी” (पारदर्शकता ) आणि “टेस्टिंग ” (चाचण्या ) हे आहेत. 
आपचे प्रवक्ते राहुल म्हांबरे  यांनी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत,  “आपण सर्व सध्या एका कठीण परिस्थितीतून जात आहोत. गोवेकरांना सरकारकडून सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे.  लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या तीन “टी” शब्दांवर काम करणे सरकारला फार महत्वाचे आहे ,असे मत व्यक्त केले.
आरोग्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या “वादळ संपले आहे ” या विधानाविषयी  म्हांबरे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका बाजूला आरोग्यमंत्री म्हणतात की गोव्यात 1 हजार कोविड रुग्ण दर  दिवशी आढळून येणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात की “वादळ संपलेले आहे “. सध्याच्या परिस्थितीचे नेमके वास्तव चित्र गोवेकरांसमोर मांडण्यापेक्षा लोकांच्या गोंधळात ते भर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. जणू ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत असावेत. सध्या अनेक प्रश्नाची नेमकी योग्य उत्तरे मिळणे गरजेचे असून यामध्ये कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची नेमकी संख्या हा ऐरणीचा मुद्दा आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या  रुग्णांची नेमकी संख्या अजून सरकारने जाहीर केलेली नसून काही जणांना अधिकृतपणे कोविड मृत झालेले व्यक्ती म्हणून अजून जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या गरज सत्य मांडण्याची असून गोष्टी लपविण्याची नाही, असे म्हांबरे म्हणाले.
गोवेकरांसाठी सरकारने जास्त पारदर्शक प्रणाली उभारणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांना आपल्या भागातील सुविधांविषयी माहिती मिळू शकेल. आपापल्या भागांमधील हॉस्पिटल्समध्ये किती प्रमाणात बेड्स उपलब्ध आहेत? कुठे जावे, कुणाशी बोलावे याविषयी लोकांना काहीही माहिती नसल्याने तो एक चिंतेचा विषय आहे. सरकारने प्रत्येक ठिकाणच्या हॉस्पिटल बेड्सच्या स्थितविषयी वेळेत माहिती पुरवावी. किमान रोज काढल्या जाणाऱ्या आरोग्य बुलेटिनमध्ये त्याविषयीचा तपशील तरी द्यावा. 5 जुलै रोजी आरोग्यमंत्र्यांकडून कोविडसाठी वापरल्या जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स वाहने वाढविण्याविषयीच्या आश्वासनानंतरही वाहने उपलब्ध होत नाहीत. या विषयाला आता 2 महिने होत आले असून गोमंतकीय जनता अजूनही ऍम्ब्युलन्स वाहनांची वाट पाहत आहे. गोव्यातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर करीत असल्याची टीका  राणे करीत होते, तर मग लोक राहतात त्या भागात त्यांच्यासाठी किती ऍम्ब्युलन्स वाहने उपलब्ध आहेत? याचे उत्तर राणे यांनीच लोकांना द्यावे, असे म्हांबरे यांनी स्पष्ट केले.
चाचण्या वाढविणे ही सध्याची सर्वात महत्वाची बाब आहे. कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत असताना चाचण्यांचे प्रमाण 1500 ते 2000 पर्यंतच मर्यदित राहिले आहे. बाकीच्या सरकारांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविलेले आहे. दिवसाला 40 हजार चाचण्या घेण्याचे विसरून जा पण किमान 5 हजार चाचण्या घेणे या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक बनले आहे. आतील भागांसाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सोय करणे आवश्यक आहे कारणे दुर्गम भागातील लोकांना स्वतःची चाचणी करून घेण्यात अडचणी येत आहेत.
बहुतेक चाचणी केंद्रे रविवारी बंद असतात. ही विचित्र व्यवस्था सध्या तरी बंद व्हायला हवी कारण कोरोना आपल्या आरोग्यमंत्र्यांप्रमाणे एक दिवसाची सुट्टी घेत नसतो. सध्याची महामारी फैलावण्याचा जोर पाहता ही केंद्रे नेहमी चालूच ठेवावीत.
सरकार जर खरोखरच कोरोनाविरुद्ध लढा देण्याविषयी गंभीर असेल, तर सर्व गोवेकरांच्या सूचनांकडे तसेच विरोधी पक्षाच्या सल्ल्यांकडे सरकारने लक्ष द्यावे तसेच सर्वांबरोबर मिळून काम करावे. खालच्या स्तरावरचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. गोमंतकीय लोकांचे जीव पणाला लागलेले असून आता आम्ही सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे.