आयुष राज्यमंत्री नाईक आणि गोवा शिपयार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्शाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
737

 गोवा खबर:‘कोरोनाव्हायरस’च्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य लोकांना अडचणीचे दिवस काढावे लागत आहे. गेली दोन- अडीज महिने फारशी प्राप्ती नसलेल्या रिक्शाचालकांना गोवा शिपयार्डच्या सहाय्याने धान्य, तांदुळ, साखर , आटा आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे, असे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक  यांनी सांगितले.

पाटो येथील पर्यटन भवनच्या समोर मंगळवारी खासदार नाईक आणि गोवा शिपयार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी शहरातील सुमारे 200 रिक्शाचालकांना मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष दयानंद सोपटे, उत्तर गोवा भाजप मंडळ अध्यक्ष महानंद अस्नोडकर, गोवा शिपयार्डचे सरव्यवस्थापक मनोरंजन, संचालक ऑपरेशन श्रीकृष्ण कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

संचालक श्रीकृष्ण कामत म्हणाले, की गोवा शिपयार्डच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी  एक दिवसाचे वेतन दान केले असून या निधीतून गरजवंतांना देण्यासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

पणजी रिक्शाचालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश यादव यांनी आभार मानताना सांगितले, की कोरोनाच्या संसर्गामुळे पणजीतीत रिक्शा, पायलट व टॅक्सी व्यावसायिकांना वाईट दिवस आले आहेत. लोक रस्त्यावर फिरकत नसल्याने आणि प्रवास करण्यास मनाई असल्याने आम्हाला ग्राहकच नसल्याने दिवस काढणे कठीण होत आहे. बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच भाजी, मासे , भुसारी मालाची किंमत महाग झाली असल्याने आमचे कंबरडेच मोडले गेले आहे. यावेळी खासदार नाईक आणि गोवा शिपयार्डने  केलेल्या मदतीमुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला आहे.