आयुष मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भाजपच्या खोटारडेपणा व जुमला संस्कृतीचे दर्शन: गिरीश चोडणकर

0
738
 गोवा खबर : ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिंस चार्ल्स यांना झालेला कोरोनाचा संसर्ग आयुर्वेदीक उपचार केल्याने बरा झाल्याचे धादांत खोटे व दिशाभूल करणारे विधान भाजपच्या मोदी सरकारचे आयुष मंत्री व गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी करुन भाजपच्या खोटारडेपणाचे व जुमला संस्कृतीचे विदारक सत्य लोकांसमोर पुन्हा एकदा आणले आहे,अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
ब्रिटनच्या राजघराण्याच्या अधिकृत प्रवक्त्याने भारताच्या आयुष मंत्र्यांचे विधान खोटे असल्याचे सांगीतल्याने, कोणताही वैज्ञानिक आधार नसताना केवळ सवंग प्रसिद्धी मिळवीण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या पुढे करुन लोकांना मुर्ख बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अजेंडा पुढे नेण्याचा श्रीपाद नाईकांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, गोव्याचे प्रतिनीधित्व करणाऱ्या श्रीपाद नाईकांच्या या वक्तव्याने गोवेकरांना लाजेने मान खाली घालावी लागली आहे.
टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, आपणच अंधकार करुन आपणच दीवे लावा असे भन्नाट सल्ले लोकांना देऊन नरेंद्र मोदी सरकार देशभक्तीच्या नावाने लोकांना मुर्ख बनवित आहेत,असा आरोप करुन चोडणकर म्हणाले, भाजपची ही जुमला संस्कृती देशाच्या भवितव्याशी खेळ करणारी आहे. आज मोदींच्या नाटकबाजीने देशाला आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे. परंतु भाजपला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ अंधभक्तीने या सरकारचा कारभार चालला आहे.
चोडणकर म्हणाले,कोरोना व्हायरसचे महाभयंकर संकट संपुर्ण जगासमोर  असताना व त्यावर वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधण्याचे विवीध देशांतील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत असताना, प्रिंस चार्ल्स यांच्या कोरोना उपचार पद्धतीबद्दल अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करुन श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेदाबद्दल जगासमोर चुकीचा संदेश पाठवला आहे.  त्यामुळे परदेशात आयर्वेदाबद्दल गैरसमज तयार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भाजप हा केवळ लोकांना विवीध मार्गानी मुर्ख बनवुन आपली पोळी भाजुन घेतो. आज देशात कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या हजारो डाॅक्टर्स, नर्सेस तसेच इतरांना त्यांच्या सुरक्षेसाठी  लागणारी उपकरणे उपलब्द करुन देण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे,असे सांगून चोडणकर म्हणाले, देशातील अनेक वैद्यकिय कर्मचाऱ्याना सरकारच्या बेपर्वाईमुळे कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहेत. परंतु आपल्या नाकर्तेपणांवर पांघरुण घालण्यासाठी मोदी सरकार नवनविन क्लुप्त्या लढवीत आहे. कोरोना संकटाला जातीयवादाचा रंग देण्यासही या सरकारने मागेपुढे पाहिले नाही हे दुर्देवी आहे.
मागील सत्तर वर्षात देशात काहीच झाले नाही असे गळा काढुन सांगत मते मिळवीणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तथाकथीत दूरदृष्टीने मागील ६ वर्षात तयार झालेला ३००० कोटींचा सरदार पटेलांचा पुतळा आज दर्शनासाठी सुद्धा बंद असुन, पंडित जवाहरलाल नेहरुंच्या दूरदृष्टीने १९५२ साली स्थापन झालेले पुणे येथिल नॅशनल व्हायरोलोजी इंस्टिट्युट आज देशातील कोरोना रुग्णांची चांचणी करण्यात उपयोगी पडत आहे,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.
गोव्यातही भाजपचे डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकांची केवळ दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून चोडणकर म्हणाले, आज गोमेकोतील वैद्यकिय कर्मचारी तसेच इतर इस्पितळातील डाॅक्टर जीवाच्या आकांताने कसलेही सुरक्षा कवच नसताना काम करीत आहेत. सरकारने अजुनही सामुहीक चाचण्या घेण्यास सुरुवात केली नाही. कोरोनाचा टाईम बाॅम्ब सुरू आहे व त्याचा केव्हाही प्रचंड स्फोट होऊ शकतो हे आता लोकांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे.