आयुष उपचारपद्धतीच्या प्रसारासाठी सरकारच्या उपाययोजना

0
828

 

 

गोवा खबर:आयुष उपचारपद्धतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय आयुष मिशन आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण-2017 अंतर्गत आयुष उपचारपद्धतींचा प्रसार केला जात आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत  ही माहिती दिली.

आयुष अंतर्गत केंद्र सरकार नियंत्रित मंडळे, केंद्रीय संशोधन संस्था, राष्ट्रीय संस्था, अखिल भारतीय संस्था, राष्ट्रीय वनऔषधी मंडळ, भारतीय औषधांबद्दलचा औषधीकोश, होमिओपथी प्रयोगशाळा यांची निर्मिती केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत 506 जिल्हा रुग्णालये, 374 उप रुग्णालये, 2871 सामुदायिक आरोग्य केंद्र, 8995 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 5716 इतर आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचारपद्धती सुरु करण्यात आली आहे. आयुष उपचारपद्धतीअंतर्गत 7,99,879 नोंदणीकृत डॉक्टर आहेत, 702 पदविका महाविद्यालये, 212 पदव्युत्तर महाविद्यालये आणि 27199 दवाखाने आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुष उपचारपद्धतीच्या प्रसारासाठी 18 देशांसमवेत पारंपरिक औषधी आणि होमिओपथीसंबंधी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला आहे. सामुहिक संशोधनासंदर्भात 19, तर परदेशी विद्यापीठांमध्ये आयुष अभ्यासक्रमासंदर्भात 13 परस्पर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आयुषची अधिकृत माहिती देणारी 28 देशांमध्ये 31 माहिती केंद्र उघडण्यात आली आहेत.