आयुष्यमंत्र्यानी दिला आडपई ग्रामस्थांना  कोरोनाबाबत दिलासा

0
305

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कडक उपाययोजनांमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रकारही कमी आहेत.मात्र, आता कोरोना ग्रामीण भागातही शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. गोव्यात नव्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने सुरक्षेचे उपाय  पाळण्याची आवश्यकता आहे. कोरोनाला  अ‍ॅलोपॅथीमध्ये औषध उपलब्ध नाही. फक्त होमिओपॅथीक व आयुर्वेदामध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषध तयार करण्यात आले असल्याचे  केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी  सांगितले.

फोंडा तालूक्यातील आडपई गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने या पार्श्वभूमिवर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी गावाला रविवारी सकाळी भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी पंचसदस्य आणि ग्रामस्थांना उद्देशून ते म्हणाले, की आडपईमध्ये पहिल्यांदाच एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून तो काम करत असलेल्या एका इस्पितळामुळे त्याला संसर्ग झाला आहे. देवाच्या कृपेने हा संसर्ग एकापुरताच थांबला असून त्याच्या कुटुंबियांनाही काही धोका नसल्याचे आढळून आले आहे. काळजी घेणे आपल्या हाती आहे. यासाठी मास्क, सेनिटायर्झस, औषधे आदी गोष्टी आडपई पंचायतीकडे सुपूर्द केल्या असून प्रत्येक प्रभागातील घरात स्थानिक पंचसदस्य तसेच गावातील स्वयंसेवकांमार्फत ते वाटले जाणार आहेत.

नाईक यांनी फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.ग्रामस्थांसाठी सेनिटायझर्स, फेसमास्क तसेच प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्यांचे यावेळी त्यांनी वितरण केले.

आडपई-दुर्भाट पंचायतीच्या सरपंच सरोज नाईक, उपसरपंच सद्गुरु गावडे, पंचसदस्य मशाल नाईक, राजेश नाईक, निलेश तारी, जयराज नाईक, सचिव सर्वेश नाईक. भाजपा कार्यकर्ते प्रशांत नाईक, ग्रामस्थ सोमेश नाईक, खोलीचे सरपंच शिवा नाईक आदी उपस्थित होते.