आयुर्गोवा कोविड-१९ हे अ‍ॅपचे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्चिंग

0
638
 गोवा खबर: आयुष विभागामार्फत आयुर्गोवा कोविड-१९ हे अ‍ॅप बनवण्यात आले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्याचे लॉन्चिंग करण्यात आले.यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह वैद्या अनुरा बाळे,अभय प्रभू, वैद्य धर्मेंद्र प्रभूदेसाई,वैद्या. स्नेहा भागवत आदीं उपस्थित होते.

गोवा हे पहिले राज्य असेल, जे अलगीकरण कक्षात असलेले रुग्ण आणि पॉझिटीव्ह रुग्ण यांच्यावर आयुर्वेदीय उपचार करणार आहे. आयुर्गोवा कोविड-१९ या अ‍ॅपद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे, याची माहिती जनतेला मिळणार आहे.

 गोव्यातील लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण करणे आणि या परिस्थितीत आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो , याविषयी माहिती देण्यासाठी आयुर्गोवा कोविड-१९ हे अ‍ॅप सुरु केले आहे. या अ‍ॅपमध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ,  आहार आणि जीवनशैली यांमध्ये कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.
राज्यभरात कार्यरत असलेले आयुर्वेदीक वैद्य आणि त्यांचे संपर्क क्रमांक या अ‍ॅप मध्ये देण्यात आले आहेत.  अ‍ॅपमधून  संसर्गजन्य विकारांवर आयुर्वेदीय प्रतिबंधात्मक उपचारांविषयी माहिती देण्यात आली आहे.

गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन अर्थात गामाने समिती स्थापन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याविषयी आयुर्वेदीक प्रोटोकॉल बनवला आहे. या समितीमध्ये वैद्य उपेंद्र दीक्षित, वैद्य प्रणव भागवत, आयुर्वेदीक शल्यतज्ञ वैद्य प्रथमेश कर्पे, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या वैद्या  अनुरा बाळे, प्राध्यापक वैद्य नीलेश कोरडे, वैद्य महेश वेर्लेकर आदी वैद्यांचा समावेश आहे.
गोवा सरकारच्या आरोग्य संचालनालयाच्या आयुष विभागाकडून कोरोनाविषयी शास्त्रोक्तपणे आयुर्वेदीक उपचार करण्यासाठी गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनला मान्यता देण्यात आली आहे.
 कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदीक उपचार करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या उपक्रमानुसार कोरोनामुळे विलगीकरण कक्षात असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्यावर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांशी चर्चा करून आयुर्वेदीय वैद्य हे वैद्यकीय सल्ला आणि प्रतिबंधात्मक उपचार करु लागले आहेत. यासाठी लागणारी आयुर्वेदीक औषधे  गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे.
 गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनच्या १०० हून अधिक वैद्यांनी एकत्र येऊन संघटितपणे हे कार्य केले आहे. या कार्यासाठी या वैद्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे गामाच्या कोशात निधी जमा केला आहे. केंद्रीय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनच्या सचिव वैद्या  स्नेहा प्रणव भागवत यांनी कोरोनाविषयक प्रोटोकॉल आणि अ‍ॅप यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यात वैद्य धर्मेंद्र प्रभुदेसाई, वैद्य नितीन मांजरेकर, वैद्या  सोनल सावंत आदी वैद्यांचेही सहकार्य लाभले.