गोवा खबर : गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये  सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट जगभ्रमंतीवर निघाली होती ही बोट आज गोव्यात परतणार आहे.  स्वदेशी बनावटीच्या  शिडाच्या बोटीवर स्वार होऊन नौदलाच्या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत गेल्या १0 सप्टेंबर रोजी जग भ्रमंतीसाठी निघाल्या होत्या. त्या आज गोव्यात परतणार असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या त्यांचे स्वागत करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.
 
सध्या  ही बोट भारतीय समुद्र हद्दीत  आलेली असून गोव्यापासून अवघ्या काही सागरी मैल अंतरावर आहे. वारा नसतानाही बोटीने १२ तासात २0 सागरी मैल अंतर पार केल्याचे आढळून आले आहे.आज ही बोट गोव्यात पोचेल, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी कळवले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर घेतल्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली आहे. या प्रवासात महिला नौदल अधिकारी २१,६00 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
या महिला अधिकाऱ्यांना वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. ७ मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी ६0 किलोमिटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. आॅस्ट्रेलिया, न्युुझिलॅण्ड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रि केत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट ५५ फूट लांबीची असून गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाऱ्यांनी अनुभव घेतला.उद्या संरक्षण मंत्री सीतारामन यांच्या उपस्थितीत फ्लैग इन सोहळा पार पडणार आहे.