गोवा खबर:आयएनएसव्ही तारीणी या नौकेवरुन यशस्वीपणे विश्व प्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातील सहा महिला अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव असलेल्या या मोहिमेत केवळ महिलांचा समावेश असलेल्या नौकेने पहिल्यांदाच विश्व प्रदक्षिणा पूर्ण केली.

पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान या अधिकाऱ्यांनी आपल्या मोहिमेशी संबंधित विविध पैलू, मोहिमेची तयारी, प्रशिक्षण आणि मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली.

या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी या महिला अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या प्रवासाचे अनोखे अनुभव शब्दबध्द करुन इतरांपर्यंत पोहोचवावेत, असे आवर्जुन सांगितले. नौदल कर्मचारी प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबाही यावेळी उपस्थित होते.

लेफ्टनंट कमांडर वर्तीका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी.स्वाती तसेच लेफ्टनंट एस.विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता.