आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत : आप

0
583
गोवा खबर : आम आदमी पार्टीने सांगे येथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांबद्दल आत्मीयता व्यक्त करत त्यांना भेट दिली व शेतकर्‍यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. आपचे नेते संदेश तेलकर, सुरेल तिळवे आणि पेट्रिशिया फर्नांडिस यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.
संदेश तेलेकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे गरीब आणि खाली दबलेल्या लोकांच्या विरोधात आहे आणि केवळ अदानी आणि जिंदालसारख्या पैशाच्या धंद्यातील लहरी उद्योगपतींच्या इच्छिची पूर्तता करते आणि  राष्ट्रीय राजधानीत शेतकरी आंदोलन करीत असताना गोव्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकांकडे लक्ष देण्याऐवजी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
मेलौळी गावात आमच्या गोव्यातील शेतकर्‍यांवर लाठीचार्ज आणि अश्रू गॅसचा मारा केला गेला, कारण ते त्यांच्या इच्छेविरूद्ध सरकार चोरी करू इच्छित असलेल्या त्यांच्या स्वतःच्या भूमीसाठी लढत होते आणि सांगेमध्ये आमचे गोवन शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी लढा देत आहेत, पण मुख्यमंत्री सावंत केवळ ‘गांजा’ शेतीत रस आहे असे दिसते आहे, असे संदेश म्हणाले.
अ‍ॅड सुरेल तिळवे यांनी निदर्शनास आणून दिले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राजभवनाच्या नूतनीकरणासारख्या सर्व अनावश्यक गोष्टींसाठी पैसे आहेत पण त्यांच्याकडे  उसाला मोबदला मिळावा अशी मागणी करणाऱ्या गरीब व संघर्षशील शेतकऱ्यांना देण्यासाठी एक पैसादेखील नाही.
शेतकरी सोन्याच्या भांड्यासाठी विचारणा करत नाहीत तर गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी विकलेल्या पिकाच्या सरासरीनुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत,ही अत्यंत वाजवी मागणी आहे,जी फसवे मुख्यमंत्री समजू शकत नाहीत, सुरेल म्हणाले.
पेट्रीशिया फर्नांडिस म्हणाल्या की, शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा उदरनिर्वाहाचा विषय आहे आणि ते त्यांच्या ऐशोआरामासाठी नव्हे तर खरोखरच त्यांच्या अस्तित्वाची मागणी करीत आहेत आणि म्हणूनच असंवेदनशील भाजपा सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांचे दुःख समजून घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
“शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी १२ कोटी रुपयांची रक्कम लागेल. मुक्तिदिनासाठी १०० कोटी ची उधळपट्टी करण्यास मुख्यमंत्री इच्छुक आहेत पण या रकमेच्या १/१० रक्कमेत गोव्यातील शेतकऱ्यांची मागणी मान्य होऊ शकते परंतु यासाठी मुख्यमंत्री इच्छुक नाहीत. ”पेट्रीशिया म्हणाल्या.