आमच्यासाठी गोवेकारच प्रथम, गोवा फॉरवर्ड एनडीएतून बाहेर : विजय सरदेसाई

0
201
गोवा खबर : गोवा फॉरवर्ड पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून अधिकृतपणे बाहेर पडल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.आघाडीचे अध्यक्ष अमित शहा याना तसे पत्र पाठविले आहे असे त्यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड पार्टीच्या कार्यकारिणीची मंगळवारी बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. गुढी पाडव्याच्या आजच्या पवित्र दिवशी आमच्या पक्षासाठीच ही नवीन सुरवात नसून आमचे सहकारी जे गोवा पुढे नेऊ पाहतात त्या सर्वांसाठी ही नवीन राजकीय सुरवात असल्याचे ते म्हणाले. वास्तविक राष्ट्रपतीच्या गोवा मुक्ती हिरक महोत्सवी कार्यक्रमासह सर्व सरकारी कार्यक्रमात सहभागी न होता याआधीच आम्ही या आघाडीतून बाहेर आल्याचे स्पष्ट केले होते. आज ही अधिकृत घोषणा होत आहे. आमचे लागेबांधे. गोवेकारांशी आहेत. आम्ही या आघाडीकडे भविष्यात कुठलेही संबंध ठेवणार नाहीत असे ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले, जुलै 2019 पासून भाजप गोवेकारांचा घात करत आहे. या भाजप सरकारची धोरणे गोवा विरोधात आहेत. ज्यावेळी मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपची धोरणे गोव्यासाठी पोषक होती मात्र प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यावर या सरकारची धोरणे बदलली. 2019  सलीच आमचे रालोआशी संबंध तुटले होते. त्यामुळेच म्हादई, मोले, रेल्वे दुपदरीकरण, बेरोजगारी, कोविड गैरव्यवस्थापन या साऱ्या प्रश्नावर आम्ही विद्यमान सरकारला धारेवर धरले होते असे सरदेसाई यांनी सांगितले.
प्रमोद सावंत यांच्या कर्तुत्वहीन सरकारमुळे मागची दोन वर्षे गोव्याची आम जनता भरडली गेली आहे. या सरकारने गोवा विकायला काढला होता मात्र आम्ही विरोध करून त्यापासून काही प्रमाणात सरकारला रोखून धरण्यास यशस्वी ठरलो. या सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाही तत्वेही पायाखाली चिरडली. याच सरकारच्या नाकर्तेपणामुळे म्हादईचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मोलेत वृक्षहानी करण्यास या सरकारने मान्यता दिली. बेरोजगारी वाढली. गोव्याच्या जमिनी बाहेरच्या लोकांच्या घशात घालण्याची कारस्थाने शिजली. आर्थिक गैरव्यवस्थापणामुळे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले. गोव्यात गुन्हेगारी वाढली. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली या सरकारातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आणि काही ठराविक व्यक्तींचीच मक्तेदारी सुरू झाली. ज्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला मनोहर पर्रिकर यांनी विरोध केला होता त्याच प्रकल्पाला झटपट पैसे कमावता येतात हे दिसून आल्यावर या सरकारने मान्यता दिली असा आरोप त्यांनी केला.
या सरकारच्या या सर्व गोवा विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सर्व राजकीय विरोधकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही सध्या काळाची गरज बनली आहे असे सरदेसाई म्हणाले. यासाठीच राजकारणी आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन टीम गोवा ही संकल्पना पुढे नेण्याची गरज आहे. गोव्यातील वेगवेगळ्या चळवळीतील नेत्यांनी आणि एनजीओनी या संकल्पनेला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्याच मागणीला मान देऊन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही रालोआतून बाहेर पडत आहोत. भाजपशी पुन्हा कसलेही संबंध ठेवणार नाही अशी शपथ आम्ही बोडगेश्वराला साक्ष ठेवून घेतली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गोव्यात गोवेकारांचे राज्य स्थापन व्हावे यासाठी गोमंतकीयांची आघाडी उभारणे हे आमच्या टीम गोवाचे ध्येय आहे. त्यासाठी या टीममध्ये राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ या सर्वांनी सामील व्हावे असे आमचे आवाहन आहे. आम्ही फक्त 2022 मध्येच परिवर्तन आणू पाहत नाहीत तर पंचायत, नगरपालिका आणि विधानसभा या सर्व स्थरावर गोव्याची धोरणे राबविणारे लोक येतील अशी व्यवस्था करण्याची ही एक चळवळ असेल असे सरदेसाई यांनी सांगितले.