आपचे सरकार येताच गोव्याला 48 तासांच्या आत मोफत वीज देणार: राघव चड्डा

0
245
गोवा खबर: दिल्लीत देण्यात येणाऱ्या वीज प्रणाली प्रमाणे गोव्यातील जनतेला एकत्र मोफत किंवा स्वस्त वीज आम्ही सत्तेवर आल्यास 48 तासांच्या आत देणार आहोत अशी घोषणा आम आदमी पक्षाचे दिल्ली येथील आमदार राघव चड्डा यांनी गोमंतकीय प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
 चड्डा म्हणाले, गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांनी दिल्ली येथील वीज पुरवठा आणि दर प्रणाली आणि गोव्यातील वीज दर प्रणाली याविषयी उघड सार्वजनिक वादविवाद किंवा खुली चर्चा करण्याचे उघड आव्हान जे जाहीरपणे दिले होते त्यापासून त्यांनी स्वतःच पाठ फिरविली आहे. पत्रकार परिषदेतच त्यांनी सर्वांसमोर काब्राल यांना फोन लावायचा प्रयत्न केला पण तो व्यस्त आहे असेच सूचित होत होते.
काब्राल  नक्की कुठले प्रशासकीय निमित्त काढून ही चर्चा टाळायचा प्रयत्न करीत आहेत? असा प्रश्न चड्डा यांनी यावेळी उपस्थित केला.
 काब्राल यांच्याप्रमाणे आपणही विधानसभेचा निर्वाचित आमदार आहे. दिल्ली सरकारमधील एक खाते म्हणजेच जल मंडळाचा कारभार हाताळत आहे,त्यामुळे प्रोटोकॉल सारखा आहे,असे चड्डा म्हणाले.
 दिल्लीच्या वीज मंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरेन्स घेण्याचा प्रस्तावही चड्डा यांनी मांडला होता पण काब्राल यांचा फोन डायल केल्यावर सातत्याने व्यस्त येत असल्याने त्याविषयीही त्यांची अपेक्षित प्रतिक्रिया समजू शकली नाही.
चड्डा म्हणाले, दिल्लीत जे लोक 200 युनिट पर्यंत वीज वापरतात त्यांना विजेचे बिल शून्य रुपये येते कारण त्यांना वीज मोफत दिली जाते आणि जे नागरिक 200 ते 400 युनिट वीज दर महिन्याला वापरतात त्यांना फक्त बिलाची अर्धी रक्कम भरावी लागते. म्हणजे 50 टक्के सूट मिळत आहे. आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात येताच याच पद्धतीने 48 तासांच्या आत गोव्यातही वीज दर लागू केले जातील .
गोवा आणि दिल्लीतील वीज बिलांची तुलना करताना ते म्हणाले,जे लोक दिल्लीत 200 युनिट पर्यंत वीज वापरतात त्यांना काहीही पैसे द्यावे लागत नाहीत. जे 200 ते 400 युनिटपर्यंत वीज वापरतात त्यांची बिले गोवेकरांच्या बिलांपेक्षा खूपच स्वस्त व कमी असतात. भाजपला हे गोव्यात करणे जमलेले नाही कारण त्यांच्याकडे लोकांना हा लाभ मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.
 दिल्लीत सरळ मार्गाने जाणारे आणि प्रामाणिक सरकार आहे, पण गोव्यात अशा प्रशासनाचा अभाव आहे,असा आरोप करून चड्डा म्हणाले, दिल्लीत लोकांना अखंडित वीज पुरवठा 24 तास उपलब्ध असतो पण गोव्यात वीज खंडित होण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. खुद्द वीजमंत्र्यांच्या मतदार संघात वीज जाण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. गोव्यातील जनतेची लूट करण्यात आली आहे.
चड्डा म्हणाले,गोव्यात सत्ताधारी भाजपने धुडगूस घालत घोडेबाजार करताना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकून आल्यावर त्यांना भाजपमध्ये घेणे पसंत केले. यामध्ये त्यांना किती पैसे दिले गेले, कुणालाही माहित नाही. गोव्यात पुढच्या वेळी होणारी विधानसभा निवडणूक आप आणि भाजप यांच्यामध्ये होणारी थेट लढत असेल, असे सांगून चड्डा म्हणाले,  गोवेकरांना भाजपने फसवून लुटलेले असताना काँग्रेस आज पूर्णपणे बाहेर फेकली गेलेली आहे. गोव्यातील राजकारणातून काँग्रेसचे अस्तित्वच संपलेले आहे हे लोकांनी काँग्रेसला ज्याप्रमाणे झिडकारले आहे.
 गोव्यातील जनता आम आदमी पक्षाला मत देण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे कारण आप हा एकच असा पक्ष आहे ज्याला गोव्याची काळजी आहे आणि राजकीय घडामोडी गोव्यात अशा बदलेल्या आहेत की काँग्रेसला आता अर्थ किंवा अस्तित्व राहिलेलेच नाही, असे चड्डा म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना चड्डा म्हणाले सुविधांच्या बाबतीत बोलायचे तर दिल्लीत महिलांना सार्वजनिक वाहतूक मोफत मिळते, मुलांसाठी शिक्षण मोफत आहे पण गोव्यात पालकांना मुलांसाठी पुस्तके भरमसाठ खर्च करून विकत घ्यावी लागतात. दिल्लीत मोहल्ला क्लिनिक सारखी सुविधा आहे ज्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जी सुविधा भरमसाठ किमतीमध्ये मिळते, तीच सुविधा मोहल्ला क्लिनिकमध्ये विनामूल्य दिली जाते.
 प्रदूषणाची समस्या दिल्लीपुरतीच मर्यादित नाही तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या संपूर्ण भागामध्ये आहे. वाराणसी येथील हवेचा दर्जा दिल्लीपेक्षा वाईट आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे तर मग आपल्याच मतदारसंघातील हवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी का केला नाही, असा प्रश्न करत चड्डा यांनी गेल्या वर्षी दिल्लीतील हवा प्रदूषणाचा स्तर 25 टक्के खालावला असल्याचे नमूद केले. दिल्लीत कोविड केसेस वाढत असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले कारण कोविडच्या तिसऱ्या टप्प्यातून दिल्ली जात आहे पण कोविड हाताळण्यासाठी आप कडून वापरण्यात आलेले दिल्ली मॉडेल इतर ठिकाणी अवलंबिण्यात येत असून तेच सर्वोत्तम असल्याचे सगळीकडे मान्य केले जात असल्याचे चड्डा यांनी उच्चारवाने सांगितले.
  दिल्ली निवडणुकीत सुरुवातीला आपला कमी लेखले जात होते पण याच पक्षाला शेवटी जनतेने तीनवेळा सत्तेवर आणले आणि एकवेळा विक्रमी विजय प्रस्थापित केला,याकडे लक्ष वेधत गोव्यात देखील असाच चमत्कार येत्या निवडणुकीत होईल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.