आधुनिक भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका सर्वात महत्वाची : मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांनी व्यक्त केले मत

0
548

 गोवा खबर:आधुनिक भारत घडवण्याच्या कामात युवकांचा लक्षणीय सहभाग असेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या 60व्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. येत्या दशकावर, 21 शतकात जन्मलेल्या युवकांचा प्रभाव राहिल. देशाच्या विकासात या युवकांची भूमिका महत्वाची ठरेल, असे सांगत नव्या पिढीकडून देशाला आणखी मोठ्या उंचीवर नेण्याची संपूर्ण देश वाट बघत आहे, असे मोदी म्हणाले.

 

येणारे दशक हे युवकांचे आणि एकत्रित युवाशक्तीमुळे देशाच्या विकासाला आकार आणि गती देणारे दशक म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आजचा युवक अत्यंत बुद्धीमान आणि कुशल असून, काही तरी नवे करण्याची स्वप्न बाळगून आहे. आजच्या युवकांना स्वत:ची मत आहेत, तसेच त्यांना व्यवस्थेविषयी आदर असून, अराजकतेविषयी त्यांच्या मनात राग आहे, असे मोदी म्हणाले. देशाच्या व्यवस्थेचा, चांगल काही घडवण्यासाठी वापर व्हावा, अशी युवकांची इच्छा आहे आणि त्यासाठी जाब विचारण्याचीही त्यांची तयारी आहे. अस्थिरता, जातीयवाद, लिंगभेद किंवा इतर कुठले भेदभाव, कुप्रशासन या सर्व गोष्टींविषयी या युवकाच्या मनात नाराजी आहे. ही नवी पिढी नव्या भारताच्या नव्या व्यवस्थेचे प्रतिक आहे, ही पिढी एक नवी शिस्त, नवे युग आणि नवा विचार आणू पाहते आहे, याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

येत्या जानेवारी महिन्यात 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाईल. त्यादिवशी प्रत्येक युवकांना आपल्या जबाबदाऱ्यांविषयी विचार करावा, असे मोदी म्हणाले.

देशातल्या प्रत्येक नागरिक स्वावलंबी व्हावा आणि त्याला प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे पंतप्रधान म्हणाले. देशी उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी सर्वांनी स्थानिक उत्पादने वापरावी, असे आवाहन मोदी यांनी केले. देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी उत्तर प्रदेशातल्या फुलपूर जिल्ह्यातल्या बचतगट चालवणाऱ्या महिलांचे उदाहरण दिले. या महिलांनी पादत्राणे बनवण्याचा व्यवसाय उभा करत, आपल्या कुटुंबाला आर्थिक बळ दिले आहे.

देशातल्या युवकांनी विवेकानंद स्मारकासारख्या पर्यटन स्थळांना भेट द्यावी, यातून देशाचा इतिहास आणि विचार समजून घेता येईल. त्यासोबत पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या सुर्यग्रहणाच्या संदर्भात त्यांनी मन की बात मधून खगोलशास्त्राविषयी देखील चर्चा केली. भारताला खगोलशास्त्राची प्राचीन परंपरा आहे. आधुनिक काळातही खगोलशास्त्राचा हा वारसा पुढे नेण्यात आला आहे. युवकांनी खगोल विज्ञानाकडे गांभिर्याने बघावे, त्याचा अभ्यास करावा, असे मोदी म्हणाले.