आतिश नाईक यांची जागृत छायापत्रकारीता

0
1377
गोवाखबर:जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक प्रचलित म्हण आहे.पत्रकारीतेमध्ये कार्यालयात बसलेल्या उपसंपादकाला बातमीदाराने दिलेली बातमी जीवंत करून दाखवण्याचे काम छायापत्रकार करत असतो.महाराष्ट्रात वर्तमानपत्रात काम करणाऱ्यांना फोटोग्राफर किंवा छायाचित्रकार म्हणून ओळखले जाते.अमुक फोटो आमच्या छायाचित्रकाराने टिपला आहे असे फोटो ओळीत नमूद केलेले असते.गोव्यात हेच काम करणाऱ्यांना छायापत्रकार म्हणून का ओळखले जाते त्याचे उत्तर गोमंतक टाइम्समध्ये मुख्य छायापत्रकार म्हणून काम करत असलेल्या आतिश नाईक यांनी दाखवून दिले आहे.
कॅसिनोंची आर्थिक ताकद प्रचंड आहे.त्यामुळे सरकारी अधिकारी,राजकरणी मंडळी कॅसिनो मालकांच्या खिशात असतात.असा काहीसा अनुभव यावा अशी सध्या परिस्थिती आहे.मोठ दिव्य करून मांडवी नदित उतरलेल्या महाराजा या तरंगत्या कॅसिनोच्या चालकांनी बंदर कप्तान खात्याशेजारील पदपथ आपल्या बापजाद्यांची मालकीचा असल्याचा गोड गैरसमज करून घेऊन कायदा धाब्यावर बसवून आपल्या ग्राहकांसाठी पायघडया पसरल्या होत्या.अगदी कायद्याचे रक्षक,कायदा बनवणारे मायबाप सगळी जबाबदार मंडळी डोळे उघडून आणि डोकी बंद करून हा प्रकार पाहत होती.काहीजण मनातल्या मनात राग व्यक्त करत असतील परंतु जाहिर बोलून किंवा तक्रार करून या बाबत आवाज उठावण्याची हिम्मत कोणाकडून होत नव्हती.
गोमंतक टाइम्सचे छायापत्रकार आतिश नाईक यांच्या नजरेत हा प्रकार आला तेव्हा त्यांनी आपला कॅमेरा हत्यार म्हणून चालवला. आपल्या वर्तमानपत्रातुन महाराजाची दादागीरी वाचकांच्या नजरेस आणून दिल्या नंतर नाईक यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मे रोजी त्यातील फोटो फेसबुकवर पोस्ट करून बंदर कप्तान मंत्री जयेश साळगावकार यांचे लक्ष वेधले होते.त्यानंतर देखील महाराजाच्या छत्राच्या केसाला सुद्धा कोणी हात लावू शकला नाही.वर्तमान पत्रातील बातमीची दखल घेऊन संबंधीत यंत्रणेने खडबडून जागे होत अतिक्रमण हटवण्याची हिम्मत दाखवण्याची गरज होती मात्र सगळ्याचे हात कदाचित बांधले गेलेले असावेत त्यामुळे कोणी तो विषय गंभीरपणे घेण्याची तसदी घेतली नसावी.
नाईक यांच्या फोटोमुळे काँग्रेसला आयता विषय मिळाला. काँग्रेसने धडक मारत आंदोलन केले मात्र त्या नंतर देखील महाराजाचा बाल कोई बाका करू शकला नाही.काँग्रेसने हात टेकल्या नंतर आपने दंड थोपटले, माहिती हक्क कार्यकर्ते काशीनाथ शेट्ये यांनी आपल्या स्टाइलमध्ये किदे चल्ला रे पात्रावचा व्हिडिओ व्हायरल केला.तरी महाराजा फुटपाथ वरुन हलला नाही.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काम करण्याची पद्धत जरा हटके आहे.त्यांच्या पर्यंत विषय गेला आणि त्यांनी दणका दिल्यानंतर महाराजाच्या साम्राज्यात भूकंप झाला आणि बघता बघता फुटपाथने मोकळा श्वास घेतला.
आतिश नाईक केवळ फोटोग्राफर असते तर कदाचित महाराजाची दादागिरी आणखी काही दिवस तशीच चालली असती. किंवा भविष्यात कायम सुद्धा झाली असती.मात्र नाईक यांनी छायापत्रकार म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली आणि त्यांना काँग्रेस,आप,शेट्ये यांनी बळ दिल्यामुळे महाराजाच्या जोखडातुन जुन्या सचिवालया समोरिल फुटपाथ मोकळा होऊ शकला.
गोकूळाष्टमी च्या काळात धेंपे हाउस समोरिल फुटपाथवर अष्टमीची फेरी भरते.हातावर पोट असलेली मंडळी चार पैसे कमावतात.मात्र पणजी महानगर पालिका लगेच पोलिस फौजफाटा घेऊन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारुन आपली कर्तव्यदक्षता दाखवते.गेल्यावर्षी या प्रकारावेळी देखील आतिश नाईक यांनी गोर गरीब स्टॉल धारकांची बाजू उचलून धरली होती.फोटोग्राफर मध्ये पत्रकार असेल तेव्हाच हे शक्य होते.कॅसिनोच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक करणारे अष्टमीच्या फेरीवर कारवाई करताना सगळी हत्यार पाजळून आले होते.यावरून गरीबांना कायदा वेगळा आणि कॅसीनोंना कायदा वेगळा हेच परत एकदा सिद्ध झाले आहे.