आता स्वतंत्र ग्रेटर पीडीएवर खर्च करणे मूर्खपणाचे:दत्तप्रसाद

0
1017
गोवा खबर:ग्रेटर पणजी पीडीए मधून बहुतेक भाग वगळण्याची घोषणा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे.त्यामुळे ग्रेटर पणजी पीडीएत तसा अर्थ राहिलेला नाही.सरकारने विनाकारण ग्रेटर पणजी यंत्रणेसाठी खर्च करण्यापेक्षा पर्वीची परिस्थिती कायम ठेवावी.ताळगाव उत्तर गोवा पीडीएचा भाग पूर्वी पासून असल्याने फारसा फरक पडणार नाही,अशी टिप्पणी करत भाजपचे प्रवक्ते तथा ताळगाव मंडळ अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी बाबुश मोन्सेरात यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे.
सांताक्रुझचे माजी आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या राजकीय सोयीसाठी स्थापन केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रूझ व सांतआंद्रे मतदारसंघातील सात गावे वगळणे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना भाग पडले. या गावातील लोकांचा विरोध तीव्र झाल्यानंतर सरदेसाई यांना गोंय,गोंयकार आणि गोंयकारपणाची आठवण झाली आणि काल त्यांनी ही गावे वगळल्याची घोषणा करणे भाग पडले.
सरदेसाई म्हणाले,सुरूवातीला ग्रेटर पणजी पीडीए मध्ये जो भाग समाविष्ठ केला जाणार होता तेथील आमदारांनी त्यासाठी आपली लेखी संमती दिली होती.आता लोकांचा विरोध लक्षात घेऊन त्याच आमदारांनी आपली भूमिका बदलली आहे.त्यामुळे लोकांच्या भावनांची कदर करत विरोध असलेली गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.लवकरच त्याच्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.बांबोळी पठारा वरील लोकांना पीडीए नको असेल तर तो भाग सुद्धा वगळण्यास आमची हरकत नाही.
सरदेसाई आणि मोन्सेरात यांची व्यवसायिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या ताब्यातील नगर नियोजन खाते आणि पीडीए पाहता ग्रेटर पणजी पीडीए मध्ये समाविष्ट गावातील लोकांमध्ये असंतोष खदखदत होता.स्थानिक आमदारांना देखील त्याचा फटका बसला होता.या भागात गोवा फॉरवर्डला भविष्यात आपले हातपाय पसरायचे आहेत.त्यातच 2019 मध्ये लोकसभे बरोबर विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या भागात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मतदार असल्याने त्यांना खुश करण्यासाठी सरदेसाई यांनी ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर करून पक्षाची खराब होत असलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.एवढा मोठा निर्णय जाहीर करताना ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्ष असलेले मोन्सेरात मात्र उपस्थित नव्हते.
ग्रेटर पणजी पीडीए सोबत प्रादेशिक आराखडा 2021 ला विरोध होऊ लागला आहे.आपल्या विरोधातील ही विरोधाची धार सौम्य करण्यासाठीच सरदेसाई यांनी माघार घेत ग्रेटर पणजी पीडीए मधून विरोध असलेली गावे वगळण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.आता ताळगाव आणि कदंब पठार एवढाच भाग ग्रेटर पणजी पीडीए मध्ये राहिला आहे.