आता प्रतिक्षा अमित शहांच्या निर्णयाची

0
1071
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारावर उपचार घेऊन येईपर्यंत गोव्यातील सरकार कसे चालवायचे यासंदर्भात आज दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आढावा घेतला.भाजपच्या तीन खासदार आणि 3 निरीक्षकांकडून शहा यांनी गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली.शहा येत्या 2 दिवसात आपला निर्णय कळवणार असल्याची माहीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.
 तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचार घेऊन आल्या नंतर देखील मुख्यमंत्री पर्रिकर यांची तब्बेत सुधारली नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचने नुसार पर्रिकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे.पर्रिकर यांना उपचार आणि विश्रांतीची गरज असल्याने दरम्यानच्या काळात राज्य सरकारचा कारभार कोलमडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा नेतृत्व बदल करण्याची चर्चा जोर धरु लागली होती.पर्रिकर यांना दिल्लीला हलवण्याच्या आदल्या दिवसापासून भाजपने वेगाने चक्रे हलवून 3 निरीक्षकांना गोव्यात पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या आठवड्यात रामलाल,बी.एल. संतोष आणि विजय पूराणीक यांनी गोव्यात 2 दिवस तळ ठोकुन भाजप आमदार ,घटक पक्ष आणि गोवा भाजपच्या गाभा समिती सोबत चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेतली होती.
आज दुपारी पावणे दोनच्या सुमरास पक्ष अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर आणि 3 निरिक्षकां सोबत एकत्र बैठक घेतली.
सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.भाजप आणि घटक पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केलेल्या मतांवर आणि पर्यायावर सविस्तर चर्चा झाली.गोव्यातील खासदारांनी खाणी लवकर कशा सुरु करता येतील यासह विकस कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयन्त केले जाण्याची गरज व्यक्त केली.
शहा यांनी सगळ्यांची मते जाणून घेतली असून येत्या 2 दिवसात आपला निर्णय कळवू असे सांगितल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी गोव्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तिन्ही खासदारांना आज दिल्लीत बोलावताच पर्रिकर यांच्या पर्यायाची चर्चा रंगू लागली.सकाळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक तर दुपार पासून प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांचे नाव चर्चेत येऊ लागले.नाईक आणि तेंडुलकर यांच्यात तेंडुलकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.घटक पक्ष देखील तेंडुलकर यांच्यासाठी सहमत असल्याचे सांगितले जात आहे.शहा नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतात याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
काय आहेत शक्यता….
 स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्य कारभार चालवण्यासाठी भाजप कोणता पर्यायावर शिक्कामोर्तब करणार याबद्दल उत्सुकता सर्वाना लागली आहे.भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनी आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सादर केला असून शहा यांनी भाजपच्या 3 खासदारांबोत काल प्रदीर्घ चर्चा देखील केली आहे.अहवाल प्राप्त झाल्या नंतर शहा दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेत असलेल्या पर्रिकर यांच्याशी सल्ला मसलत केल्या नंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.समितीने दिलेला अहवाल काहीही असला तरी पर्रिकर यांची पसंती निर्णायक असणार आहे.
पर्रिकर यांच्या गैरहजेरीत कोणता पर्याय निवडला जाईल याबद्दल अनेक मतप्रवाह व्यक्त केले जात आहेत.कोण म्हणत पर्रिकर हेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या कडील खाती घटक पक्षांना वाटून त्यांच्या वरील कामाचा बोजा कमी केला जाईल,कोण म्हणत सभापती प्रमोद सावंत यांच्या सारख्या एखाद्या नेत्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपचे सरकार ही ओळख टिकवली जाईल,कोण म्हणत गोवा फॉरवर्ड भाजपमध्ये विलीन करून विजय सरदेसाई यांना मुख्यमंत्री केले जाईल,मगो पक्षाला वाटतय की सुदिन ढवळीकर हे ज्येष्ठ मंत्री असल्याने मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली जाईल,मगोचे विलीनीकरण करून देखील प्रश्न सोडवला जाईल अशी चर्चा आहे.सगळे पर्याय कुचकामी ठरले तर मागच्या वेळी सारखा मंत्रीमंडळ सल्लागार समितीचा पर्याय अवलंबवावा लागणार आहे.
काल दिवसभरात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची नावे चर्चेत होती.नाईक आणि तेंडुलकर यांच्यात तेंडुलकर यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
निरीक्षक म्हणून आलेले भाजपचे संघटन सरचिटणीस रामलाल यांच्या मते भाजप जो काही निर्णय  घेईल तो घटक पक्षांना मान्य असणार असून त्यांनी तशी सहमती दर्शवली आहे.एकूण राजकारण बघितले तर सुदिनचे नेतृत्व सरदेसाई मान्य करणार नाहीत,सरदेसाई नेते झाले तर ते मगोला जास्त हातपाय पसरायला वाव देणार नाही.दोन्ही पक्ष एकमेकांचे नेतृत्व कितपत मान्य करतील हा गंभीर प्रश्नच आहे.त्यामुळे पर्रिकर यांना तांत्रिकदृष्टया मुख्यमंत्री कायम ठेवून प्रमोद सावंत सारख्या एखाद्या तरुण नेत्याकडे सुत्रे सोपवली तर भविष्यात नवे नेतृत्व भाजपला आपोआपच मिळणार आहे.मात्र सावंत यांचे नेतृत्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कितपत रुचेल हा प्रश्नच आहे.
मुख्यमंत्री अमेरिकेत उपचारासाठी गेले होते तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ध्वज्ववंदन करण्यासाठी मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्र्या ऐवजी सभापती असलेल्या सावंत यांची निवड केली होती.सावंत यांनी सभापती म्हणून काम करताना आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे.विरोधक आक्रमक झाले तरी त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्याचे आणि प्रसंगी खंबीरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची त्यांची कार्यशैली त्यांना नेतेपदापर्यंत याघडीला नेऊ शकते.
सध्याचे भाजप आघाडी सरकार घडवण्यात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची महत्वाची भूमिका आहे.त्यांना किंग मेकर म्हणून ओळखले जाते.विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डचे भाजपमध्ये विलीनीकरण करावे आणि मुख्यमंत्री व्हावे असे लोबो यांना वाटते असे सुत्रांचे म्हणणे आहे.लोबो हे सरदेसाई यांच्या प्रमाणे सावंत यांचा पर्याय देखील पडताळून पाहत असावेत.कारण मुख्यमंत्री दिल्लीस निघण्यापूर्वी फक्त लोबो आणि सावंत यांनाच ते भेटले होते.
भाजपचे आजच्या घडीला 14 आमदार आहेत.त्यातील मुख्यमंत्री पर्रिकर,वीज मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा आजारी असून विविध ठिकाणच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.त्यामुळे सभागृहात केव्हा बहुमत सिद्ध करायची वेळ आली तर पूरेसे संख्याबळ असावे यादृष्टिने देखील भाजप चाचपणी करत आहे.
काँग्रेस मधील काठावर असलेल्यांना भाजपमध्ये खेचणे किंवा मगो,गोवा फॉरवर्ड पैकी एका पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करणे याचीही पडताळणी केली जात आहे.मुख्यमंत्रीपद मिळाले तर मगो आणि गोवा फॉरवर्ड पक्ष त्याला नकार देण्याची शक्यता कमी वाटते.सरदेसाई यांनी तर आपण आपल्या पक्षा बरोबर अपक्ष आमदारांना सोबत घेऊन काम करु शकतो याचे संकेत निरीक्षक भेटीवेळी दिले आहेत.भाजपच्या हायकमांड कडून कोणता पर्याय स्वीकारुन सरकार सुरळीत चालवले जाईल याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.