आता काँग्रेसने म्हादई बाबत आपली भूमिका जाहीर करावी:शिवसेना

0
994

गोवा खबर:जनतेचा कौल झुगारुन राज्यपाल यंत्रणेचा गैरवापर करत बहुमत नसताना देखील कर्नाटक मध्ये केंद्रातील सत्तेच्या जोरावर आपले सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अपेक्षे प्रमाणे भंग झाले.लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून सत्ता हस्तगत करण्याचा भाजपचा डाव अखेर उधळला गेला आणि लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला,अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राखी प्रभूदेसाई नाईक यांनी कर्नाटक मधील राजकीय घडामोडींवर व्यक्त केली आहे.
नाईक म्हणाल्या,कर्नाटक प्रमाणे भाजपने गोव्यात आणि इतर राज्यांमध्ये देखील राज्यपाल कार्यालयाचा गैर वापर करून सत्ता हस्तगत केली आहे.गोव्यात जनतेने भाजपला नाकारले होते तरी भाजपने राज्यपाल यंत्रणेचा गैर वापर करून सत्ता मिळवली आहे.कर्नाटक मध्ये आज भजापला जो धडा मिळाला आहे तो पाहता भविष्यात भाजप असले लोकशाहीला मारक असलेले प्रकार करणार नाही अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
कर्नाटक मध्ये आज भाजपचा कुटील डाव उधळला गेल्यामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे.त्याच बरोबर सुप्रीम कोर्टावरील विश्वास दृढ़ झाला असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.
भाजप नेहमी देश प्रथमच्या बढाया मारत असला तरी त्यांना देशाचे काहीच पडून गेलेले नाही,अशी टीका करून नाईक यांनी
भाजपचे आमदार राष्ट्रगीताचा देखील सन्मान राखत नाही.फक्त काही करून सत्ता मिळवायची हेच भाजपचे ध्येय बनले आहे.राष्ट्रगीत सुरु असताना उठून जाणाऱ्या भाजप आमदारांचा निषेध करावा तेवढा थोड़ाच आहे.राष्ट्रगीतावेळी उठून जाणाऱ्या भाजप आमदारांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली.
कर्नाटक मध्ये जे राजकीय सत्तान्तर झाले आहे त्यातून गोव्याला दिलासा मिळेल अशी आशा असली तरी आता प्रश्न आहे तो म्हादई नदीच्या पाण्याचा असल्याचे सांगून नाईक म्हणाल्या,आपली सत्ता आली तर 6 महिन्याच्या आत म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते.आता भाजप पायउतार झाल्यामुळे काँग्रेसने म्हादई बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
काँग्रेस ने जेडीयू सोबत सरकार स्थापन केल्या नंतर म्हादई बाबत तेथील मतदारांना खुश करण्यासाठी गोव्याच्या हिता विरोधी भूमिका घेतली तर आम्ही ती कदापि सहन करणार नाही,असा इशारा देखील नाईक यांनी दिला आहे. म्हादई जल लवादाच्या निवाड्या व्यतिरिक्त कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही याची काँग्रेस-जेडीयू सरकारने दखल घ्यायला हवी,असे नाईक यांनी ठणकावून सांगितले आहे.
काँग्रेस कडून जल्लोष
कर्नाटक मध्ये बहुमत सिद्ध करण्यापूर्वी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामूळे काँग्रेस आणि जेडीयू  सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.येडीयुरप्पा यांनी राजीनामा देताच पणजी येथील काँग्रेस मुख्यालया समोर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी  झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते यतीश नाईक यांनी कर्नाटकमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून गोव्यात देखील कर्नाटकच्या पद्धतीने सत्तेवर असलेल्या सरकारने राजीनामा द्यावा आणि सर्वात मोठ्या असलेल्या काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास द्यावी अशी मागणी केली. गोव्यातील भाजप आघाडी सरकार अलोकतांत्रिक पद्धतीने सत्तेवर आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे नाईक यांनी यावेळी ठणकावून सांगितले.