आझाद मैदानावरील स्मारक बनले परप्रांतीयांचे लॉजिंग बोर्डिंग

0
988
गोवा खबर:राजधानी पणजी मधील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखण्यात संबंधित यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. हे स्मारक  फूकटया परप्रांतीयांसाठी आता लॉजिंग बोर्डिंग बनले आहे.

शहराच्या मध्यभागी पोलिस मुख्यालयाला लागून असलेले आझाद मैदान परप्रांतीयांसाठी फूकटचे लॉजिंग बोर्डिंग बनले आहे.
आझाद मैदानावर वर्ष भर अनेक कार्यक्रम होत असतात.लोकांची नेहमी ये-जा सुरु असते.तरी देखील ही परप्रांतीय मंडळी निवांतपणे या स्मारकाच्या चारही बाजूला डाराडुर झोपलेली असतात.ही मंडळी कुठून आली,काय करतात याबद्दल कोणाला काहीच पडून गेलेले नसल्याचे दिसून आलेले आहे.
माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी देखील 8 ते 10 जण या स्मारकाच्या आजू बाजूला झोपलेले होते.
पुठठे आणि बॅनर खाली अंथरुन ही मंडळी आरामात झोपलेली असतात.स्मारकाच्या आजुबाजूला सिगारेट,चिप्सची पाकिटे, जेवणाच्या पिशव्या,पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या सगळीकडे दिसून येत आहेत.
मैदानावर असलेल्या सुलभ शौचालयामुळे या फुकटयांची आणखीच सोय झाली आहे.झोपुन उठल्या नंतर मस्तपैकी आंघोळ करून,कपडे धुवून ते तेथील झाडाच्या फांद्यांवर वाळत देखील घातलेले दिसतात.गृहमंत्री तथा भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांनी लावलेल्या चाफ्याच्या झाडाला देखील या मंडळींनी सोडले नाही.त्यावर देखील वाळत घातलेले कपडे दिमाखात झळकताना पहायला मिळतात.या चाफ्याच्या बाजूला वाढलेल्या झाडीत दारूच्या बाटल्यांची असलेली रास परिसराची शोभा घालवत स्मारकाचे पावित्र्य भंग करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मुरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ यादव यांनी स्मारकाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळींचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा,अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत,पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात,महापौर उदय मडकईकर आणि पणजी पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी,अशी मागणी माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आझाद मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
आझाद मैदानावर बऱ्याचदा कचरा पहायला मिळतो.दारूच्या बाटल्या,सिगरेट्सची पाकिटे ही नियमित बाब बनली आहे.
मैदानवरील स्मारका प्रमाणे मैदानाच्या कंपाउंड साठी बांधलेल्या कठड्यावर देखील दिवसा काही मंडळी झोपुन असतात.त्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा रक्षक नसल्याने सगळे प्रश्न निर्माण होत असल्याचे महापौर उदय मडकईकर म्हणाले.जीएसआयडीसीने मैदानाचे सुशोभीकरण केल्या नंतर कंपाउंडवर असलेले ग्रिल्स काढून टाकल्याने कोणीही सहज आत असल्याचे महापौर मडकईकर यांचे म्हणणे आहे.
मैदानावरील लाद्या धोकादायक
आझाद मैदानात घातलेल्या लाद्या पावसामुळे प्रचंड बुळबुळीत झाल्या आहेत.त्यावरून चालणे धोकादायक बनत आहे.मैदाना सभोवतालचा फुटपाथ देखील बुळबुळीत बनला असून त्यावरून देखील लोक चालताना घसरत आहेत.पावसात या लाद्यांची आणि फुटपाथची सफाई करून ते चालण्यास सुरक्षित बनवावे अशी मागणी केली जात आहे.