आजच्या पिढीने गांधी विचार रुजवावे- राज्यपाल

0
988

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात आयुष मंत्रालयाकडून शिबिरांचे आयोजन-श्रीपाद नाईक

गोवा खबर:महात्मा गांधींचे विचार कालातीत आहेत. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीने अंगीकार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांनी केले. गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांनी आयोजित केलेल्या निसर्गोपचार शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार पाठक, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका डॉ के सत्य लक्ष्मी, पत्र सूचना कार्यालयाच्य अतिरिक्त महासंचालक अर्मेलिंदा डायस यांची उपस्थिती होती.

गांधीजींच्या साहित्याचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे, त्यातील संदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे राज्यपाल म्हणाल्या. गांधीजींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचा कोंकणी अनुवाद आहे, हे ऐकून अतिशय आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येकाने गांधी विचार आपल्या आयुष्यात रुजवले पाहिजेत. निसर्गोपचार हा गांधीजींच्या विचारांचाच भाग आहे. पंचतत्वाचे संतूलन बिघडले तर आरोग्य बिघडते. म्हणून गांधीजींनी निसर्गोपचारास प्राधान्य दिले होते, असे राज्यपाल पुढे म्हणाल्या. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या गांधी वाटिका या चित्रप्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली.

केंद्रीय आयुष मंत्रालय वर्षभरात दीडशे निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन करणार आहे. त्याची सुरुवात गोव्यातून होत असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. निसर्गोपचार शिबिराच्या उदघाटनानंतर श्रीपाद नाईक मिरामार ते कला अकादमी वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. निसर्गोपचार संस्थेच्या संचालक डॉ के सत्य लक्ष्मी यांनी प्रास्ताविक केले. तर, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक अर्मेलिंदा डायस यांनी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोने आयोजित केलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोने आयोजित केलेल्या सकस आहार स्पर्धेत गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स, तसेच अनेक महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला.