आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे!

0
608

अयोध्या निकालावर पंतप्रधानांचे संबोधन

माझ्या प्रिय देशवासियांनो,

मी दिवसभर पंजाबमध्ये होतो.

माझे कर्तव्य आहे की, मी आपल्याशी थेट संवाद साधावा

आज सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे, ज्यामागे शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

संपूर्ण देशाची इच्छा होती की, या प्रकरणाची न्यायालयामध्ये दररोज सुनावणी व्हावी, जी झाली आणि आज निर्णय आला. दशकांपासून चालत आलेल्या न्याय प्रक्रियेची आज सांगता झाली.

मित्रांनो,

संपूर्ण जगाला माहित आहे की, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, आज जगाला हे ही माहित झाले की भारताची लोकशाही किती जिवंत आणि मजबूत आहे.

निर्णय आल्यानंतर ज्याप्रकारे प्रत्येक वर्गाने, समुदायाने, विविध धर्माच्या लोकांनी, पूर्ण देशाने खुल्या मनाने याचा स्वीकार केला आहे. हे भारताची प्राचीन संस्कृती, परंपरा आणि सद्भावनेचे प्रतिबिंब आहे.

बंधु आणि भगिनींनो,

भारताची जी ओळख आहे- विविधतेत एकता, आज ही भावना पूर्णपणे दिसून आली.

हजारो वर्षानंतरही कोणाला विविधतेत एकता, हे भारताचे प्राणतत्व समजून घ्यायचे असेल तर आजचा ऐतिहासिक दिवस आहे, आजच्या घटनेच्या माध्यमातून समजेल, जी आम्ही स्वतः उभा करत आहोत, स्वतः लिहित आहोत.

मित्रांनो,

भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासातही आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये नोंदवण्यासारखा आहे.

या विषयावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्वांचे म्हणणे ऐकले, मोठ्या धैर्याने ऐकले आणि सर्वसंमतीने निर्णय दिला.

हे साधे काम नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामागे दृढ इच्छाशक्ती दिसून येते.

म्हणून यासाठी,

देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि आपली न्याय प्रणाली अभिनंदनासाठी पात्र आहेत.

मित्रांनो,

9 नोव्हेंबरचाच दिवस होता,

ज्या दिवशी बर्लिनची भिंत पाडण्यात आली होती.

दोन  परस्परविरोधी विचारसरणींनी एकजूट होऊन नवीन संकल्प केला होता.

आज 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची सुरुवात झाली. यात भारताचे सहकार्य आहे,  आणि पाकिस्तानचेही.

आज अयोध्याप्रकरणी निकालानंतर 9 नोव्हेंबर ही तारीख आम्हाला एकत्र राहून पुढे जाण्याची शिकवण देत आहे.

आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे.

या विषयावर कोणाच्या मनात काही कटुता राहिली असेल, तर आजच तिला तिलांजली देण्याचा दिवस आहे.

नव्या भारतात भय, कटुता, नकारात्मकता यांना स्थान नाही.

मित्रांनो,

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं देशाला हा ही संदेश दिला आहे की कितीही किचकट, गुंतागुंतीचा प्रश्न असेल तरीही त्याचा तोडगा राज्यघटनेच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीतच निघू शकतो.

या निर्णयातून आपण हे ही शिकलो आहोत की कदाचित उशीर लागू शकतो, मात्र आपले धैर्य आणि संयम कायम ठेवणे हेच योग्य आहे.

भारताची राज्यघटना, भारताची न्यायव्यवस्था यावरील आपला विश्वास कोणत्याही परिस्थितीत कायम असतो, ही बाब अत्यंत महत्वाची आहे.

मित्रांनो.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आपल्यासाठी नवी पहाट घेऊन आला आहे.
या वादाचा परिणाम कदाचित अनेक पिढ्यांवर झाला असेल. मात्र या निर्णयानंतर आपल्याला हा संकल्प करायला हवा की आता नवी पिढी, नव्या उमेदीने नव-भारताच्या निर्मितीसाठी झटून काम करणार आहे

चला, आता एक नवी सुरुवात करूया.
आता नव्या भारताची उभारणी करूया.

आपला  विश्वास आणि विकास निश्चित करताना आपल्याला हे बघावं लागणार आहे  की आपल्यासोबत वाटचाल करणारा मागे तर नाही राहून गेला.

आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करायची आहे. सर्वांचा विकास करत आणि सर्वांचा विश्वास संपादन करत आपल्याला प्रगती करायची आहे.

मित्रांनो,
राममंदिर बांधण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता देशातल्या प्रत्येक नागरिकाची राष्ट्र उभारणीची जबाबदारी आणखी वाढली आहे.

त्यासोबतच, एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांवर देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करणे, नियम-कायद्याचा सन्मान करणे हे जबाबदारी देखील वाढली आहे. आता एक समाज या नात्याने, प्रत्येक भारतीयाने आपली कर्तव्ये, आपली जबाबदारी याला प्राधान्य देत काम करायचे आहे.

आपल्यातील सौहार्द, आपली एकता, आपली शांतता  देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाची आहे.
आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची आहे. भविष्यातील भारतासाठी काम करत राहायचं आहे.
भारतासमोर, अनेक आव्हाने आहेत. अनेक लक्ष्य आहेत, अनेक उद्दिष्टे गाठायची  आहेत.
आपण सर्व भारतीय, एकत्र वाटचाल करतच ही उद्दिष्टे साध्य करणार आहोत. आपल्या ध्येयापर्यत पोहचणार आहोत.

जय हिंद!