
गोवा खबर:पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरच्या 64 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज संबोधित केले. देशातील तंत्रशिक्षण विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच्या काळात केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीमध्ये आयआयटी खरगपूरच्या निर्मितीची बीजे रोवली गेली होती. स्वातंत्र्य प्राप्तीला आणि समितीच्या स्थापनेला कित्येक वर्ष उलटून गेल्यानंतर आज आयआयटी खरगपूर आणि खरे तर भारतीय तंत्रशिक्षण संस्था या बाहेरच्या देशाकडे पाहण्याचे माध्यम म्हणून कार्यरत आहेत असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
अभियांत्रिकीपासून अर्थकारणापर्यंत आणि वैद्यकीय क्षेत्रापासून व्यवस्थापनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये संकल्पना, कौशल्य आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होत राहिल्यामुळे त्या अनुषंगाने धोरणे विकसित होत राहिली आणि नागरिकांचा विकासही होत राहिला. हा क्रम असाच सुरु राहावा अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. देशभरातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांना आपण भेट दिली आहे. सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थीनींची कामगिरी अधिक सरस असल्याचे दिसून आले. आयआयटीमध्ये मात्र विद्यार्थीनींची संख्या कमी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. 2017 साली 1,60,000 उमेदवारांनी आयआयटीची संयुक्त प्रवेश परीक्षा दिली. यात केवळ 30,000 मुलींचा समावेश होता. आयआयटी खरगपूरमध्ये 11,653 विद्यार्थी असून त्यात केवळ 1925 मुलींचा समावेश आहे. हे प्रमाण 16 टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे. या प्रमाणात लवकरात लवकर वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे आग्रही मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले. आगामी दशकात विज्ञान, तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे. याला राष्ट्रीय प्राधान्य मिळाले पाहिजे आणि त्यासाठी आयआयटी समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
या समारंभात राष्ट्रपतींनी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह आणि ए पी जे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय अतिथीगृहाची पायाभरणीही केली.