गोवा खबर:आज मान्सून गोव्यात दाखल होईल आणि पुढचे पाच दिवस पाऊस धुमाकुळ घालेल असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला होता मात्र आज देखील मान्सूनने वेधशाळेला चकवा दिला.वेधशाळेने मात्र मान्सून दक्षिण गोव्यात दाखल झाला असल्याचे सांगत येत्या 24 तासात मान्सून उत्तर गोवा सर करेल अशी शक्यता वर्तवली आहे.
पणजी वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांच्या माहितीनुसार मान्सून दक्षिण गोव्यात पोचला आहे.मान्सून अर्ध्या गोव्यात पोचण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे.वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात दक्षिण गोव्यातील काणकोण मध्ये 70 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.येत्या 24 तासात मान्सून उत्तर गोव्यातून दक्षिण कोकणच्या दिशेने जाईल असे वेधशाळेने म्हटले आहे.गोव्याच्या अर्ध्या भागात मान्सून पोचला असा दावा वेधशाळा करत असली तरी गोव्यातील बराच भाग कोरडा ठणठणीत आहे.बऱ्याच भागात कडक उन पडले असून उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.काल रात्री साडे आठ नंतर तुरळक पाऊस पडला. आज सकाळ पासून मात्र आकाश नीरभ्र असून कडक उन्हामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे.