आंदोलजीवी महात्मा गांधीच्या सत्याग्रहाने भारताला स्वातंत्र्य  व लोहियांच्या क्रांतीने गोव्याला मुक्ती मिळाली : दिगंबर कामत 

0
268
गोवा खबर : भारताची लोकशाही व संघराज्य प्रणालीतील विवीधतेतुन एकता यावर कॉंग्रेस पक्षाचा ठाम विश्वास असुन, आंदोलनजीवी महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाने देश स्वतंत्र झाला व डॉ. राम मनोहर लोहियांच्या क्रांतीने गोव्याला मुक्ती मिळाली. जगाच्या नकाशावर कोठेही वास्तव्य करुन असलेल्या गोमंतकीयास गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आवाज उठविण्याचा संपुर्ण अधिकार आहे असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजप सरकारला विरोध करणाऱ्या संघटना विरूद्ध केलेल्या उपरोधक वक्तव्यावर भाष्य केले होते त्यावर प्रतिक्रीया देताना दिगंबर कामत यांनी मत व्यक्त केले.
काल संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलनजीवी जमात तयार झाल्याचे म्हटले होते व एफडिआयचा अर्थ फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आययडियोलोजी असा लावला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकाचा सरकारला नमते घेण्यास लावणारा लोक आंदोलनांचा इतिहास समजुन घ्यावा. डॉ. राम मनोहर लोहियांच्या व डॉ. जुलियांव मिनेजीस यांच्या क्रांतीने गोव्याला मुक्ती मिळाली. जनमत कौलाने गोव्याचे वेगळेपण राखले. पन्नास टक्के सवलत आंदोलनाने विद्यार्थ्यांना बस टिकीटात सवलत मिळाली. कोंकणी प्रजेचो आवाज आंदोलनाने मातृभाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. प्रादेशीक आराखडा व सेझ आंदोलनाने तत्कालीन सरकारला आपले निर्णय बदलावे लागले असे दिगंबर कामत म्हणाले.
शेळ-मेळावलीच्या लोक आंदोलनाने सत्तरीचा आयआयटी प्रकल्प रद्द झाला. सांतआंद्रे मतदारसंघातील नावशीच्या लोकांनी केलेल्या आंदोलनाने मुख्यमंत्र्याना मरिना प्रकल्प रद्द करावा लागला. यापुढे गोमंतकीय जनतेच्या आवाजाने सरकारला पर्यावरणाचा नाश करणारे तिन प्रकल्प रद्द करावेच लागतील असा विश्वास दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
देश-विदेशात पोटा-पाण्यासाठी कश्ट करुन काम करणारे गोमंतकीय विदेशी चलनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करतात हे कदापी विसरुन चालणार नाही. परदेशात वास्तव्य करुनही त्यांनी आपल्या मातृभूमिशी नाते तोडलेले नाही व येथील कुटूंबियांसाठी ते आधारस्थंभ असतात. गोव्याची अस्मिता, पर्यावरण, वन व वन्यप्राणी यांचा नाश व विध्वंस करणाऱ्या प्रकल्पां विरूद्ध व सरकारच्या चुकीच्या निर्णया विरूद्ध आवाज उठविण्याचा त्यांना पुर्ण अधिकार असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगीतले.
सरकारने लोकांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे असुन, आपल्याच भावंडाना देशद्रोही व विकास विरोधी म्हणणे गैर आहे. भारत देशाचा विकास भारतीय जनता पार्टीचा जन्म होण्याच्या आधिपासुनच होत आला आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
काल लोकशाहीच्या मंदिरात आपल्या न्याय मागण्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यां विरूद्ध पंतप्रधानानी केलेली टिकाटिप्पणी दुर्देवी असुन, त्यांचीच री ओढुन मुख्यमंत्र्यानी केलेले भाष्य धक्कादायक आहे. लोकशाही पंरपरेला हे घातक आहे असे दिगंबर कामत म्हणाले.