आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 साठी डीडी भारतीवर सामान्य योग अभ्यासक्रम सत्रे

0
194

 

 गोवा खबर:प्रसार भारतीच्या सहयोगातून आयुष मंत्रालय 11 जून 2020 पासून डीडी भारती वर सामान्य योग अभ्यासक्रमाचे दररोज प्रसारण आयोजित करीत आहे. सामान्य योग अभ्यासक्रम सत्रे दररोज सकाळी 08:00 ते 08:30 या वेळेत प्रसारित केली जातील. त्याच वेळी ही सत्रे मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध असतील. या अर्ध्या तासाच्या सत्रात सामान्य योग अभ्यासक्रमाच्या सर्व प्रमुख बाबींचा समावेश असेल.

दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे जनतेला योगाचे दृकश्राव्य प्रात्यक्षिक देऊन सामान्य योग अभ्यासक्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रसारण आयोजित केले जात आहे. सामान्य योग अभ्यासक्रमाची आधीपासून झालेली ओळख लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 मध्ये सक्रिय सहभागासाठी पूर्णपणे तयार आणि सज्ज राहण्यास मदत करेल.

दूरदर्शनवरील सामान्य योग अभ्यासक्रम सत्रांचा उपयोग योगाचे विविध पैलू शिकण्यासाठी आणि रोजच्या योगाभ्यासाद्वारे मिळणार्‍या फायद्याचा लाभ घेण्यासाठी संदर्भ स्त्रोत म्हणून लोकांना वापरता येतील.

दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी, आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन आला आहे. अशा परिस्थितीशी योग विशेषत: संबंधित आहे, कारण त्याचा अभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. या कठीण काळात विशेष महत्त्व असलेले योगाचे खाली दिलेले दोन सिद्ध फायदे लोकांना मिळविता येतील.

a)      सामान्य आरोग्यावर आणि प्रतिकारशक्ती वाढीवर सकारात्मक प्रभाव.

b)      तणाव दूर करण्यासाठी म्हणून त्याची जागतिक स्तरावर स्वीकारलेली भूमिका.

 

मागील वर्षांमध्ये, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा भारताच्या संस्कृती आणि परंपराचा उत्सव म्हणून समजला जात होता. या वर्षी, या विशेष परिस्थितीत, चांगले आरोग्य आणि मानसिक शांती शोधण्याचा प्रयत्न असेल. म्हणून यावर्षी योग दिनाच्या दिवशी म्हणजे 21 जून 2020 रोजी घरी योग करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आयुष मंत्रालय इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि इतर माध्यमांचे विविध स्त्रोत उपलब्ध करुन देऊन लोकांना योग शिकण्यात सहाय्य्यभूत ठरेल. मंत्रालयाच्या योग पोर्टल आणि सोशल मीडिया हँडल्सवर असंख्य ऑनलाइन संसाधने यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मागील वर्षांप्रमाणे, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 च्या योगाचा सराव 21 जून 2020 रोजी सकाळी 7.00 वाजता सुरु होईल, तथापि, लोक आपापल्या घरातून त्यामध्ये सहभागी होतील. हे देखील अपेक्षित आहे की अनुयायी, चिकित्सक आणि योगाचे अनुयायी देखील यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल व्यासपीठावर त्यांच्या योग प्रात्यक्षिकासह सहभागी होतील (जे मागील वर्षांप्रमाणेच सामान्य योग अभ्यासक्रमावर आधारित असतील).

सामान्य योग अभ्यासक्रम (सीवायपी) सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या केंद्रस्थानी आहे. अग्रगण्य योगगुरू आणि तज्ञ यांच्या गटाने हा अभ्यासक्रम विकसित केला आहे आणि त्यात जनतेचे  शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी सुरक्षित पद्धतींचा समावेश आहे. हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय योग कार्यक्रमांपैकी एक आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो. वय आणि लिंग विचारात न घेता कोणीही सहजपणे करू शकेल या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे आणि साध्या प्रशिक्षण सत्र आणि ऑनलाइन वर्गांद्वारे तो शिकू शकता येतो.

(योगाचा अभ्यास करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस आरोग्यविषयक तक्रारी असतील तर त्यांनी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सुचविण्यात आले आहे).