आंतरराष्ट्रीय योग दिवस-2018 साजरा करण्यासाठी जय्यत तयारी

0
975

गोवा खबर:21 जून 2018 रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम यंदा उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे होणार आहे. मंत्रालयाने योग दिवस साजरा करण्यासाठी विशिष्ट उपक्रम राबविण्याकरीता देशभर संघटित प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मंत्रालये व त्यांचे विभाग, राज्य सरकार, ग्राम प्रधान (सुमारे 2.5 लाख गावे), योग संस्था, शैक्षणिक संस्था, चेंबर्स ऑफ कॉमर्स या सर्वांना सदर उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली असून काही उपक्रम सुचविण्यात आले आहेत. या संस्था त्यांच्या स्वरूपानुसार संबंधित उपक्रम राबवतील, अशीही माहिती यावेळी नाईक यांनी दिली.

यावर्षीपासून दोन श्रेण्यांमध्ये प्रत्येकी दोन ‘पंतप्रधान योग पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. यामध्ये योग क्षेत्राचा विकास व प्रचार-प्रसारामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिलेल्यांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.

यानिमित्ताने सर्व जिल्ह्यांमध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रम, 50 योग उद्याने उभारण्यात आली आहेत. याशिवाय पुढील वर्षभरात आणखी 150 उद्याने उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यस्तरीय योग महोत्सव यांची देखील आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. याव्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे आयुष मंत्रालय भारतीय रजोनिवृत्ती संस्थेच्या सल्लामसलतीने वय वर्ष चाळीस पुढील महिलांसाठी योग नियमावली विकसित करत आहे. हि नियमावली आंतरराष्ट्रीय योग दिवशी प्रकाशित करण्यात येईल. आयुष मंत्रालय व भारतीय रजोनिवृत्ती संस्था 21 जून रोजी यावर विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

गोवा राज्यात देखील 21 जून रोजी राज्य प्रशासन मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग या सोहळ्यासाठी उपस्थित असतील, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. राज्यात पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा व सावर्डे येथे योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.