आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसोबत चित्रपटांची सहनिर्मिती करण्यासाठीच्या संधी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न

0
1860

 

 

 

गोवा खबर:बर्लिन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 मध्ये भारतीय चित्रपट उद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय सहभागी झाले आहेत. या महोत्सवादरम्यान चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्या सहकार्यातून चित्रपटांची सहनिर्मिती करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

याच अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहसचिव टी.सी.ए. कल्याणी, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद यांनी युरोपिय चित्रपट निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. विशेषत: 51 व्या इफ्फीसाठी सहनिर्मिती करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. भारतात चित्रपट निर्मिती अधिक सुलभ व्हावी यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती या अधिकाऱ्यांनी या प्रतिनिधींना दिली.

याशिवाय युरोपियन फिल्म मार्केटचे संचालक मथिजीज वॉवटर नॉन यांचीही भेट घेतली.  ही कंपनी 51 व्या इफ्फी महोत्सवात सक्रीय सहभाग घेण्यास इच्छूक आहे, असे नॉन यांनी सांगितले.

त्यानंतर मिफा (MIFA) सिटीया (CITIA) या चित्रपट निर्मिती संस्थांच्या प्रमुखांशी भारतीय प्रतिनिधी मंडळाने चर्चा केली. विविध देशात आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांचे प्रतिनिधी देखील या महोत्सवात उपस्थित आहेत. या प्रतिनिधींशी चर्चा करून इफ्फीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण यांना भारतीय अधिकाऱ्यांनी दिले.

भारत आणि जर्मनी यांच्यातल्या सहनिर्मितीचा प्रवास आणखी पुढे नेत इफ्फी 2020 मध्ये हा सहभाग असावा यादृष्टीने यावेळी जर्मनीच्या चित्रपट निर्मित निर्मात्यांशी चर्चा करण्यात आली.

भारतीय सिनेमा परदेशी चित्रपट उद्योगात अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि त्यायोगे भारतातल्या चित्रपट उद्योगात व्यवसायाच्या नव्या संधी आणि गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने या महोत्सवात इंडियन पॅवेलियनचे काम सुरू आहे.