अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणाऱ्यांकडून सीएएवरुन लोकांची दिशाभूल:विश्व हिंदू परिषद

0
725
गोवा खबर:नागरिकता संशोधन कायदा हा पाकिस्तान,बांगलादेश आणि अफगाणीस्तान मधून धार्मिक छळामुळे भारतात येऊन राहिलेल्या तेथील अल्पसंख्यांकांना नागरिकता देणारा कायदा आहे.यातून कोणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही.जे लोक भारतातील अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करून स्वतःची पोळी भाजतात तीच मंडळी लोकांची दिशाभूल करून हिंसाचार फैलावत आहेत.त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे,असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोव्यात हाती घेतलेल्या कामांचा आढावा आणि हितचिंतक सदस्य नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी परांडे गोवा दौऱ्यावर आले आहेत.यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या गोवा शाखेच्या वतीने पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत परांडे बोलत होते.
परांडे म्हणाले,सीएए वरुन लोकांची दिशाभूल करून सुरु असलेली हिंसक आंदोलने आता सहन करण्या पलीकडे गेली आहेत.
झारखंड मधील लोहरदगा येथे हिंदुवर प्राणघातक हल्ले होत आहेत,याकडे लक्ष वेधुन परांडे म्हणाले, राजधानी दिल्ली मध्ये आंदोलनातून होत असलेला हिंसाचार गंभीर बनला आहे.आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडवून ठेवल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.इतकेच नाही तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात हींदूंचे जाणे येणे मुश्किल झाले आहे.आंदोलनाच्या आडून काँग्रेस सहित अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारे राजिकीय पक्ष स्वतःची पोळी भाजून घेत असून त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे.
काश्मीर मधील हिंदुना आपल्याच देशात निर्वासित म्हणून रहावे लागते,ही चिंताजनक गोष्ट असल्याचे सांगून परांडे म्हणाले, आम्ही काश्मीर मधून विस्थापित झालेल्या लोकांसाठी सर्वतोपरी मदत करत आहोत.त्यांना पुन्हा काश्मीर मध्ये वसवणे हे आमचे उद्दिष्ट असणार आहे.
अयोध्ये मधील राममंदिरा संदर्भात बोलताना परांडे म्हणाले,राम मंदिर पूर्वी ज्या पद्धतीने बांधायचे ठरले आहे त्याच पद्धतीने त्याची उभरणी व्हायला हवी.त्यात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होता कमा नये.मंदिर सरकारच्या नव्हे तर लोकांच्या पैशातून उभारले जावे,अशी आमची इच्छा आहे.राम मंदिरासाठी लढा देणारी काही मंडळी सध्या सरकार मध्ये असल्याने कोणताही अडथळा येणार नाही अशी आमची अपेक्षा आहे.येत्या चार ते पाच वर्षात भव्य राम मंदिर उभे राहिल यात शंका नाही.