अरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

0
1002

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

“अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती.

अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता.

आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला.

भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.

अरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ”,  असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून  शोक व्यक्त

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांचे निधन ही फार दुःखद घटना आहे. मी प्रवक्ता म्हणून दिल्लीत आल्यानंतर त्यांच्याकडे राहत होतो. उत्कृष्टता, वक्तृत्व, चर्चेत प्रभावीपणे मुद्दे मांडण्याची हातोटी, समर्पित प्रयत्न, उत्कृष्ट नियोजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा पक्षाला संसदेत लाभ झाला. संसदेत त्यांच्यासोबत दहा वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे निधन पक्ष आणि देशासाठी मोठी हानी आहे.

त्यांच्या निधनाने आम्ही शोकाकूल आहोत. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट ब्लॉग लिहिला होता. पण, ते आता आपल्यात नाहीत, याचे दुःख आहे.

अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “अरुण जेटली ही माझे दीर्घकाळापासून स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे देशाची तसेच माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधणारे आणि अवघड बाबी सोप्या करुन समजावणारे व्यक्ती होते”.