अमेरिकेत उपचार घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर गोव्यात परतले

0
1298

 गोवा खबर:5 मार्च रोजी स्वादुपिंडावरील उपचारासाठी अमेरिकेत गेलेले मुख्यमंत्री जवळपास सव्वातीन महिन्या नंतर आज गोव्यात पोचले.सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पर्रिकर दाबोळी विमानतळावरुन बाहेर पडून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गेले.
पर्रिकर यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वगळता एकही आमदार,मंत्री किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, आरोग्यमंत्री राणे आणि पर्रिकर यांचे दोन्ही मुलगे तसेच खाजगी सचिव रूपेश कामत एवढीच मोजकी मंडळी पर्रिकर यांच्या सोबत होती.
मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी त्यांच्या 1313 क्रमांकाच्या कारसह विमानतळावर 5 वाजल्या पासूनच हजर होते.विमानतळ परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पर्रिकर यांची देहबोली नेहमीप्रमाणे सकारात्म दिसून आली तरी उपचारामुळे त्यांचे बाह्य स्वरूप बदलून गेले आहे.त्यांचे केस विरळ झाले आहेत.शरीर थकल्यासारखे जाणवत आहे.
विमानतळावरुन बाहेर पडल्या नंतर पर्रिकर हे पोलिसांच्या गराडयातुन थेट आपल्या कारमध्ये बसून निघुन गेले.त्यांनी आपल्या चाहत्यांकडे बघून हास्य केले आणि हात दाखवून अभिवादन केले.
पर्रिकर हे उपचारासाठी अमेरिकेत गेल्यापासून मंत्रीमंडळ बैठक झालेली नाही.उद्या ही बैठक घेण्याची पर्रिकर यांची इच्छा आहे.मात्र लांब पल्ल्याचा प्रवास करून आले असल्याने उद्या लगेच त्यांना मंत्रीमंडळ बैठक घेण्यास परवानगी मिळेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्य कारभार हाताळण्यासाठी 3 मंत्र्यांची सल्लागार समिती नेमण्यात आली आहे.या समितीला 31 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुख्यमंत्री परत आल्याने ही समिती आता बरखास्त होईल. मंत्रीमंडळ बैठकी शिवाय 18 जून रोजी क्रांतीदीनाच्या जाहिर कार्यक्रमाला पर्रिकर हजेरी लावण्याची शक्यता आहे.तसे झाले तर तो त्यांचा पहिला जाहिर कार्यक्रम ठरणार आहे.5 मार्च,13 मे आणि 31 मे अशा तीन दिवशी पर्रिकर यांनी व्हिडिओ संदेश पाठवून लोकांशी संवाद साधला आहे.त्यामुळे 3 महिन्या नंतर पर्रिकर 18 जूनच्या क्रांतीदिन सोहळ्यात सहभागी झाले तर त्यांना बघण्या आणि ऐकण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पर्रिकर मंत्रीमंडळ बैठक कुठे घेणार?यापुढे पर्रिकर यांचा जनसंपर्क कसा असणार याची उत्सुकता सगळ्याना लागून राहिली आहे.
पर्रीकरांनी खाणप्रश्न सोडवायला प्राधान्य द्यायला हवे:नाईक
पणजी:अमेरिकेत उपचार घेऊन आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतानाच पर्रिकर यांनी खाणींचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणी शिवसेना उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राखी नाईक यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.
 खाणी   बंद पाडल्यामुळे लाखो लोकांचा अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.मंत्रीमंडळ सल्लागार समिती  किंवा भाजपाच्या एकाही आमदाराला या विषयावर तोडगा काढता आलेला नसल्याने पर्रिकर यांनी त्याची दखल सर्वप्रथम घ्यावी असे नाईक यांनी सूचवले आहे.
 पर्रीकरांच्या अनुपस्थितीत सौदेबाज भाजप नेत्यांनी निरर्थक उत्तरे देऊन पीडित जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. भाजपाने या उद्योगातील सर्व सबंधीतांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर तोडगा काढून पावसाळ्यानंतर खाणी सुरु होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
 पोलीस खातेसुद्धा अतिशय निर्दयीपणे वागत आहे. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी तर लोकांवर अत्याचार केले आहेत. त्यांच्या उद्धट स्वभावामुळे लोकांचा पोलीस खात्यावरील विश्वास उडाला आहे. पर्रीकर यांनी अशा  पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या निर्दयी कृत्याबद्दल निलंबित करावे अथवा त्यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी देखील शिवसेनेने केली आहे.
  वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे आजारपणामुळे मुंबई येथे इस्पितळात दाखल आहेत. त्यांच्या उपस्थितीतही वीज पुरवठा खाते वाईट परिस्थितीत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पुरवठ्याकरिता लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. या खात्यातील हा अंधार दूर करण्यासाठी पर्रीकरांनी विशेष प्रयत्न करायला हवेत असे स्पष्ट करून नाईक म्हणाल्या, पर्रीकर मिळालेली सर्व सहानुभूती गमावून बसतील हे नक्की.