अभियंत्यानी नवनिर्मिती आणि उपाय पुरविण्यावर भर द्यावा : मुख्यमंत्री

0
716

गोवा खबर : संशोधन, नवनिर्मिती आणि उपाय पुरविणे’ या इंजिनियरिंगची पदवी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही युवकाकडून अपेक्षित असलेल्या प्रमुख गोष्टी आहेत.  आपल्या तरूणांनी रोजगाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आजची गरज आहे. प्लेसमेंट आता कठीण बनले असून वेळ महत्वाची आहे. त्यामुळे तरूणांनी स्वंयरोजगाराकडे वळले पाहिजे. त्यांनी उद्योजक बनून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व जबाबदार नागरिक बनावे. खंत व्यक्त करण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधा असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिक महाविद्यालय येथे संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या विस्तार इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाखाली निधी उपलब्ध करण्यात येणा-या आगामी करियर मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यालयाचीही पायाभरणी केली.

कला व संस्कृतीमंत्री श्री. गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक प्रभू पावसकर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. विवेक कामत आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृषाशंकर एम. एस हे यावेळी उपस्थित होते.

संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विस्तार इमारतीत ९० जण बसण्याची क्षमता असलेल्या तीन वर्ग खोल्या, दुस-या मजल्यावर एक टुटोरियल खोली आणि पहिल्या मजल्यावर संगणक लॅब, मीटींग रूम आहेत. त्याचप्रमाणे ९० आसनक्षमता असलेले पारिषदगृह, मास्टर ऑफ इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्ग खोल्या आणि तळमजल्यावर मुलींसाठी कॉमन रूम आहे.

पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने राज्याला उत्कृष्ठ अभियंते उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. याप्रसंगी मी येथील कर्मचा-यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आजचे विद्यार्थी हे भावी  अभियंते आहेत आणि त्याने किंवा तिने सक्षम अशा पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर द्यावा. बाहेर अनेक संधी आहेत. करियर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट कार्यालय हे तुमच्या कौशल्याना अंतर्मुख करण्यासाठी आणि तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करण्यासाठी योग्य ठिकाणी असून मजबूत भविष्यासाठी या सुविधेचा चांगला उपयोग करण्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करणे ही केवळ शिक्षकांचीच जबाबदारी नाही तर विद्यार्थ्यांनीही कठोर परिश्रम केले पाहिजे. करियरची योग्य दिशा निवडणे हे आज एक आव्हान आहे. एखाद्या व्यक्तीला चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करियर सल्ला केंद्र नक्की फलदायी ठरेल असे गोविंद गावडे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाममंत्री श्री पावसकर यांनी शैक्षणिक पायाभूत सुविधा पूर्ण करताना सरकार नेहमी आघाडीवर असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याने शैक्षणिक पायाभूत सुविधांना सतत प्राधान्य दिल्याचे सांगून वर्ग आयोजित करण्यास विस्तार इमारत सज्ज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेचा आनेद घेता यावा म्हणून लवकरच आवश्यक ते फर्निचरही उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

सुरवातील डॉ. कृपाशंकर एम. एस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. विवेक कामत यांचेही यावेळी भाषण झाले. मुख्यमंत्र्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी वेबसाइट तयार करण्यास मदत केलेल्या सलील नाईक, कृष्ण बिरादर आणि आमोणकर या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार केला. पूर्ती सावर्डेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर निरज राणे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.