अभाविपतर्फे ग्रामीण भागात कोविड लसीकरणाविषयी जनजागृती मोहीम

0
83
गोवा खबर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवातर्फे राज्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाबद्दल जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. अभाविप गोवाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सद्य परिस्थिती, प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरण व त्याचे महत्त्व याबद्दल शिक्षित करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांनी केपे तालुकयातील मोरपिर्ला, बार्शे या गावात जाऊन तेथील नागरीकांना वैद्यकीय मदत घेण्याचे आणि लसीकरण करण्याचे महत्त्व सांगीतले कारण विषाणूचा पराभव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी थर्मल गन वापरुन या भागातील आजारी व वृद्ध नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिमीटर वापरून ऑक्सीजन पातळी तपासली. या ग्रामीण भागातील नागरीकांशी संवाद साधल्यानंतर, त्यांनी लसीकरणाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.
याबद्दलची अधिक माहिती देताना दक्षिण गोवा जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख पवनराज सावंत देसाई यांनी सांगितले “अभाविप कार्यकर्ते राज्यातील विविध लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. हे करत असताना आमच्या लक्षात आले की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या मनात अजूनही कोविड लसीकरण बद्दलचे खूप गैरसमज आहेत व त्यामुळे ते लसीकरण करून घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. अशावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवाच्या विद्यार्थ्यांनी ठरवले की आम्ही ग्रामीण भागात जाऊन कोविड लसीकरणाबद्दल जनजागृती करू आणि त्यांचे गैरसमज दूर करून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य करू.
ह्या मोहिमेला आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की मोरपिर्ला, बारशे ह्या गावातून पाहिल्याचवेळी मोठया संख्येने लोक लस टोचून घेण्यासाठी पुढे आले. अभाविपची ही मोहीम आम्ही राज्यातील विविध ग्रामीण भागात जाऊन राबवणार आहोत.” यावेळी दक्षिण गोवा जिल्हा सहसंयोजक खेमल प्रभू शिरोडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र गुरव, अभिदिप देसाई, दक्षिण गोवा जिल्हा समिती सदस्य अक्षय शेट व विपलव लोटलीकर उपस्थित होते.