अपचनाच्या त्रासामुळे पर्रिकर अमेरिकेस जाणार:कुंकळयेकर 

0
1420
 गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अपचनाच्या त्रासामुळे आज त्यांना पुन्हा अमेरिकेतील हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी नेले जाणार असल्याची माहिती पणजीचे माजी आमदार तथा भाजपचे युवा नेते सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आज येथे दिली.
पणजी येथील पंतजली स्टोअर्सचे उद्धाटन केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुंकळयेकर म्हणाले,पर्रिकर यांची प्रकृती सुधारत आहे.त्यांचे वैद्यकीय अहवाल देखील चांगले आहेत.त्यांना थोडासा अपचनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला पुन्हा अधिक उपचारासाठी अमेरिकेस नेले जाणार आहे.

अमेरिकेत जाऊन तेथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार असून उपचारा नंतर ते लवकरात लवकर गोव्यात परत येतील असा विश्वास कुंकळयेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते आज मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेणार आहेत.भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर,माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ही नेते मंडळी लीलावती मध्ये जाऊन पर्रिकर यांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री पर्रीकर आज तिसऱ्यांदा उपचारासाठी अमेरिकेस जाणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबई मधील लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले होते मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेस जाणार आहेत.आज सायंकाळी चारच्या विमानाने ते अमेरिकेस रवाना होतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर 22 रोजी सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर  कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही.   दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते  लोकांच्या गर्दीत  सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते खासगी गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.सुरूवातीच्या माहिती प्रमाणे पर्रिकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते मात्र नंतर ते बुधवारी गोव्यात पोचतील असे मुख्यमंत्री कार्यालया तर्फे कळवण्यात आले होते.मात्र आज त्यात पुन्हा बदल झाला असून  मुख्यमंत्री आज सायंकाळी चारच्या विमानाने ते तिसऱ्यांदा अमेरिकेस रवाना होणार आहेत.
आठवड्याभरात मुख्यमंत्री तज्ञांच्या सल्ल्या नुसार अमेरिकेतून उपचार घेऊन गोव्यात परतणार असल्याची माहिती सभापती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.सभापती सावंत म्हणाले,पर्रिकर यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत असून अमेरिकेतील तज्ञांच्या सल्ल्या नुसार अमेरिकेतून उपचार घेऊन आठवड्याभरात गोव्यात परतणार आहेत अशी माहिती सावंत यांनी दिली.