अनुसूचित जमात समुदायातील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल खरेदी करण्यासाठी कर्ज योजना

0
233

गोवा खबर: गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित (जीएसएसटीएफडीसीएल) च्या लघु मुदत कर्ज योजनेंतर्गत, अनुसूचित जमात समुदायातील गरजू विद्यार्थी (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) आता शैक्षणिक हेतूसाठी मोबाईल व वायफाय जोडणी विकत घेऊ शकतात.

 

 संपूर्ण जगाला कोविड-१९ जागतिक महामारीचा फटका बसला आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाचे आयुष्य विविध प्रकारे अडचणीत आले आहे. गोवा राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील अनुसूचित जमात समुदायातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहू शकत नाहीत, कारण या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यासाठी किंवा ऑनलाईन उपलब्ध असलेली शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी आवश्क असलेला स्मार्टफोन व वायफाय जोडणी विकत घेणे त्यांना परवडत नाही, असे दिसून आले आहे.

 ही योजना अनुसूचित जमात समुदायातील गरजू विद्यार्थ्यांसाठी (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) उपलब्ध आहे, कर्जाची रक्कम ही फक्त शैक्षणिक हेतूसाठी मोबाईल व वायफाय जोडणी विकत घेण्यासाठी देण्यात येईल, कमाल रक्कम रू. १५,०००/-. कर्जाची रक्कम ही विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती पाहून समितीतर्फे मान्य करण्यात येईल, ही या योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत.

अधिक माहितीसीठी, विद्यार्थ्यांनी ०८३२-२४२६९४९ / ०८३२-२४२६२६८ या क्रमांकावर श्री. दुर्गादास गावडे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व सर्व संचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.