अदानींना भाजपकडून स्वार्थासाठी करचूकवेगीरीची मोकळीक:म्हांबरे   

0
583

 

गोवा खबर:अदानी आणि जिंदाल या उद्योगसमूहांनी गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण सेस हा कर भरण्यास नकार दिलेला असतानाही भाजप सरकार मुग गिळून गप्प आहे.सर्व सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावण्यात धन्यता मानणारे भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी अदानींनी केलेल्या हजार कोटींच्या करचूकवेगीरीकडे दुर्लक्ष करत आहे,असा आरोप   आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केला आहे.

 अदानी समूहाने गोवा सरकारच्या अखत्यारीतील वाहतूक खात्यासमोर कोळसा वाहतूक करताना सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याने कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे हा कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याची उद्दामपणाची भूमिका घेऊन देखील सरकार गप्प बसून आहे,असा आरोप करत म्हांबरे म्हणाले,सरकार हे अदानीसाठी काम करीत आहे, असे आम्ही यापूर्वीही म्हटले होते. प्रदूषण सेस भरण्यास नकार दिल्यामुळे त्याला आणखी एक जोडपावती मिळाली आहे. भाजपचे सरकार हे यापूर्वीही केवळ अदानीसाठी कार्यरत असल्यासारखे काम करीत असल्यामुळे आधीच बदनाम झालेले आहे. सर्वसामान्य गोमंतकीय लोकांसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखविलेली नाही. अदानी समूहाने गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण सेस कायदा 2000 या अंतर्गत सेस भरण्याचे डावलून करचुकवेगिरी केल्याबद्दल आम आदमी पक्षातर्फे 1 ऑगस्ट रोजी भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे (एसीबी ) अदानींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. सीएजी अथवा कॉमट्रोलर अँड ऑडिटर जनरल (कॅग) यांच्याकडून सादर झालेल्या अहवालामध्ये राज्याला 2016 या वर्षाच्या सुरवातीलाच 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही बाब समोर आल्यावर त्याच्यावर आधारित ही तक्रार करण्यात आली होती.
 त्या काळापासूनचा सेस आजपर्यंत चुकवण्यात न आल्याने हे नुकसान राज्याला सोसावे लागले आहे. हे नुकसान अथवा भरपाई आज अंदाजे 1 हजार कोटी एवढी आहे असे म्हटले जातं आहे. सरकार अशाप्रकारचे गोवा सरकारचे प्रचंड प्रमाणात नुकसान करणाऱ्या अदानीच्या विरोधात कुठलीही कारवाई का करत नाही.त्यातून कुणाचा तरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.1 हजार कोटींचा भार हा गफला वा भानगड करून ठेवणाऱ्या अदानींनी आपल्या खांद्यावर का वाहवू नये. गोव्याच्या जनतेने तो भार का वाहवायला हवा असे प्रश्न विचारत म्हांबरे यांनी सरकारकच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कॅगतर्फे नोंदविण्यात आलेल्या मुद्द्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून म्हांबरे म्हणाले, करचुकवेगिरीची वसुली आणि कारवाई न करण्याचा त्यांना नक्कीच मोबदला मिळाला असावा. गोवा राज्य कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेले असून हे कर्ज 20 हजार कोटीवर पोहोचलेले आहे. भाजप सरकारला गोव्यात जवळपास 10 वर्षे पूर्ण होणार असून कर्ज कमी होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत. पण केंद्र सरकारकडून कर्जे उपटण्याची वृत्तीच या अकार्यक्षम  भाजप सरकारकडे जास्त असल्याचा प्रत्यय येत आहे. गोवेकर लोकांच्या कल्याण करण्यामध्ये भाजप सरकारला काडीचाही रस राहिला नाही.
भाजप सरकार पूर्णपणे अकार्यक्षम आहे. राज्य पूर्णपणे कफल्लक झालेले आहे आणि यासाठी भाजप पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांचे चुकीचे आर्थिक व्यवस्थापन आणि अदानीबरोबर असलेला स्वार्थ गोव्याला आर्थिक संकटात ढकलतो आहे. अदानीला सोडून त्यांनी गोवेकरांच्या कल्याणासाठी काम केले असते, तर आज परिस्थिती वेगळी असती. 1 हजार कोटींची करचुकवेगिरीचा फटका थेट गोवेकरांना बसत असून थेट फायदा मात्र अदानीला होतो आहे. गोवेकरांच्या जीवावर पैसा करण्यासाठी अदानीला मोकळीक देण्यापेक्षा त्याला सेस भरायला भाग पाडणे या गोष्टीला सरकारने महत्व द्यायला हवे होते, असे म्हांबरे म्हणाले.
आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी  भाजप सरकार आता सार्वजनिक योजनांमधून मिळणाऱ्या पैशांमध्ये वा लाभामध्ये घट करीत सुटलेले आहे, जे दुर्दैवी आहे, असे म्हांबरे म्हणाले.
गृहनिर्माण योजनेखाली घर बांधण्यासाठीचे कर्ज वा रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याची सवलत रद्द केली आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले, गृह आधार योजना आणि दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना यांच्यावरून मिळणारी मासिक रक्कम गेले 6 महिने त्यांनी दिलेली नाही.दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजना खासगी हॉस्पिटलांमध्ये कोविड उपचारासाठी अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव सरकारने गुंडाळला आहे.
 समुद्री दर्यवर्दींना पेन्शन अजूनही देण्यात आलेले नाही. लाडली लक्ष्मी  योजनेखाली मिळणारी रक्कम कमी करण्याच्या उद्देशाने आता सरकारने अधिसूचना काढलेली आहे. यामुळे गोव्यातील अधिकतर मुली या सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभापासून बाहेर फेकल्या गेल्या आहेत.
गोवेकरांचे खिसे रिकामे करणे आणि अदानींचे खिसे भरणे ही भाजपची आर्थिक नीती अदानींचा फायदा करून देणारी आहे,असा आरोप करून म्हांबरे म्हणाले,  एका बाजूला भाजप सरकार अदानीला कर भरणा न करण्यास प्रोत्साहन देत असून दुसऱ्या बाजूने गोवेकरांच्या खिशाला कात्री लावून दडपण आणून पैसे वसूल करत आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या केलेली चोरी किंवा घातलेल्या दरोडया सारखाच आहे.