अतिरिक्त विद्यार्थ्यांना सामावून घ्या; केपेच्या सरकारी महाविद्यालयाला गोवा विद्यापीठाचा आदेश   

0
1307
  प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन;शिवसेनेचा इशारा
 गोवाखबर: केपे येथील सरकारी महाविद्यालयाच्या ज्यादा विद्यार्थांचा प्रश्न शिवसेनेने उचलून धरलेला असतानाच गोवा विद्यापीठाने एका आदेशाद्वारे सर्वच महाविद्यालयांना आवश्यक त्या मूलभूत सोई करून एकही विद्यार्थी प्रतीक्षायादीवर राहू नये, असे बजावले आहे.
       गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक, दक्षिण जिल्हा अध्यक्ष अलेक्सी फर्नांडिस, युवा संघटक व विद्यार्थी शाखेचे प्रमुख चेतन पेडणेकर, राज्य सचिव वंदना चव्हाण, केपे तालुका प्रमुख संजय देसाई व कार्यकारिणीचे सदस्य झायगल लोबो यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गोवा विद्यापीठाचे कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी यांची भेट घेतली. केपेच्या सरकारी महाविद्यालयातील विज्ञान व कला शाखेच्या प्रतीक्षायादीवर बरेच विद्यार्थी असल्याची माहिती शिष्टमंडळाने रेड्डी यांना दिली. या विद्यार्थ्यांना सामावून घेता यावे म्हणून गोवा विद्यापीठाने या महाविद्यालयाला ज्यादा वर्ग भरवण्यासाठी त्वरित ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी शिष्टमंडळाने मागणी केली.
       यावेळी झालेल्या चर्चेत रेड्डी यांनी सेना नेत्यांना सांगितले, की महाविद्यालयांनी आपल्या मूलभूत ढाच्यात बदल करून ज्यादा विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची तयारी दाखवल्यास त्याला गोवा विद्यापीठाचा काहीच आक्षेप असणार नाही. विद्यापीठ महाविद्यालयांना ना हरकत प्रमाणपत्र देईल. यासंबंधीचे परिपत्रक सगळया महाविद्यालयांना पाठविण्यात आले असले तरी केपे सरकारी महाविद्यालयाकडून आमच्याकडे अद्याप तसा अर्ज आलेला नाही, असेही रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले,  विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये असेच गोवा विद्यापीठ तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला वाटते.
       क्षमता वाढविण्यास गोवा विद्यापीठ अनुकूल असूनही केपे सरकारी महाविद्यालयाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना त्रास भोगायला लावत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी प्रतीक्षायादीवरच राहिले तर महाविद्यालयाजवळ उग्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.