अटल इनोव्हेशन मिशन, निती आयोग आणि माय गव्ह तर्फे “इनोव्हेट इंडिया प्लॅटफॉर्म” चे उद्‌घाटन 

0
889

 

 

गोवाखबर:अटल इनोव्हेशन मिशन, निती आयोग आणि माय गव्ह तर्फे आज नवी दिल्लीत  “इनोव्हेट इंडिया प्लॅटफॉर्म” चे उद्‌घाटनकरण्यात आले. अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर. रामानन आणि माय गव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. देशभरातील नाविन्यता विषयक उपक्रमांची एकत्रित माहिती या पोर्टलच्या माध्यमातूनउपलब्ध होणार आहे.

नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रम राबविणाऱ्या, देशाच्या तळागाळातील नागरिकांना या मंचाच्या आधारे नोंदणी करता येईल. हे पोर्टल देशाच्या अर्थकारणाबरोबरच सामाजिक गरजांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल असा विश्वास रामानन यांनी यावेळी व्यक्त केला. देशातील नाविन्यपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन देण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य राहिले असल्याचे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून देशातील नाविन्यतेला खतपाणी घालून विकसित करण्याचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली.

हा मंच सर्व भारतीय नागरिकांसाठी खुला असून वापरकर्त्यांना मंचावर उपलब्ध नाविन्यपूर्ण उपक्रम पाहता येतील तसेच त्याबाबत मत प्रदर्शनही करता येईल. नोंदणी करुन नागरिकांना https://innovate.mygov.in/innovateindia/. या मंचावर आपल्या, संस्थेच्या किंवा इतर कोणाच्या नाविन्यताविषयक उपक्रमांची माहिती या मंचावर देता येईल.