अटलजींच्या अस्थिकलशासह मुख्यमंत्री गोव्यात दाखल

0
869
गोवा खबर:पूर्व नियोजित कार्यक्रमा प्रमाणे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज 23 रोजी गोव्यात येणार होते. मात्र ते एक दिवस आधीच काल सायंकाळी ते गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री आपल्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी 9 ऑगस्टला अमेरिकेला रवाना झाले होते. 12 दिवस अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर काल ते गोव्यात दाखल झाले. पर्रीकर यांनी काल अचानकपणे भाजप पदाधिकाऱ्यांशी फोन वरुन संपर्क साधत आपण दुपारी 4 वाजता मुंबईत पोहोचणार असल्याचे कळवले. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी गोव्यात आणण्यासाठी गेलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासाठी थांबले.काल सायंकाळी सहाच्या सुमारास अस्थिकलश दिल्लीहून दाबोळी विमानतळावर आणण्यात आले.

खासदार व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर, प्रवक्ते सदानंद शेट तानावडे व पक्षाचे खजिनदार संजीव देसाई यांचे संध्याकाळी सहाच्या सुमारास अस्थिकलशांसह दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, खासदार नरेंद्र सावईकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, माजी आमदार सुभाष फळदेसाई दाबोळी विमानतळावर हजर होते.
मुख्यमंत्री  पर्रीकर यांनीही दाबोळी विमानतळावर अस्थिकलश पोहोचताच कलाशाचा स्विकार केला. त्यानंतर हे कलश दाबोळी विमानतळाबाहेर सज्ज ठेवलेल्या सजवलेल्या रथात स्थानापन्न करण्यात आले. दिल्लीहून अस्थिकलश दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक मुंबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. दाबोळीहून अस्थिकलश सजविलेल्या वाहनातून पणजीत आणण्यात आले.आज आणि उद्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अटलजींचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.उद्या सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या हस्ते मांडवी नदित तर दक्षिण गोव्यातील भाजप नेत्यांच्या हस्ते झुवारी नदित अटलजींच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.