अंधारातील प्रकाशाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे डिफेक्टस उजेडात आणले :गिरीश चोडणकर

0
217
गोवा खबर : केंद्रीय  पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याला भेडसावणाऱ्या म्हादई, मोले अभयारण्यातील झाडांची कत्तल, मोदींच्या क्रोनी क्लबसाठी गोव्याचे कोळसा हब मध्ये रुपांतर, शेळ-मेळावलीच्या सुपीक जमीनीत आयआयटी प्रकल्प आणण्याचा सरकारी प्रस्ताव, म्हापसा येथील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आपण अंधारात असल्याचा आव आणल्याने एका अर्थी प्रकाशाने प्रमोदांचे डिफेक्टस पुन्हा एकदा उजेडात आणले असेच म्हणावे लागेल ,अशी टिका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज म्हादई, कोळसा तसेच मोले अभयारण्य या विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले व सदर जबाबदारी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतांची असल्याचे वक्तव्य केले त्यावर काॅंग्रेस अध्यक्षानी आपली प्रतिक्रीया दिली.
गोव्याचा विश्वासघात केल्याचे पाप प्रकाश जावडेकरांना सलत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते व त्यामुळेच ते सतत तोंड नाक पुसत होते. दुर्देवाने पत्रकार परिषदेत जाताना कोविड संकट काळात केंद्रिय मंत्र्यानी एक हातरुमाल वा टिश्यू पेपर सोबत ठेवू नये हे धक्कादायक आहे,असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले,मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आता ताबडतोब सर्व तथ्ये व आकडेवारी देऊन म्हादई तसेच इतर पर्यावरण प्रकल्प समस्यांवर श्वेतपत्रीका जारी करावी. मुख्यमंत्र्यानी चार दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली होती हे जनतेला सांगणे गरजेचे आहे.
भाजपच्या राजकीय लाभासाठी कर्नाटकला फायदा मिळवून देण्यास किंवा मोदींच्या क्रोनी कॅपिटालीस्ट मित्रांना मदत करण्यासाठी एक नविन षडयंत्र या भेटीत रचल्याची दाट शक्यता आहे व त्यामुळेच सदर भेटीच्या वृत्तांता  बद्दल लक्ष विचलीत करण्यासाठीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना गोव्यात पाठविल्याचा संशय  चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.
मोदी सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याची माहिती देण्यासाठी आलेल्या जावडेकरांनी शेळ-मेळावली, म्हापसा येथिल शेतकरी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्याचे टाळले यावरुनच भाजपचे बेगडी शेतकरी प्रेम उघड होते. काल चोडण येथे मोदीनी जाहिर केलेल्या अनेक तथाकथीत योजना आमच्या पर्यंत पोचल्याच नसल्याचे तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकाश जावडेकरांनी सांगताच त्यांचा चेहरा कावराबावरा झाला होता याकडे लक्ष वेधुन चोडणकर म्हणाले, उपस्थितांचे भाजप सरकारची लक्तरे काढणारे सरळ प्रश्न ऐकताना शेजारी बसलेले कृषीमंत्री बाबू कवळेकर यांचे तोंड लाल झाले होते.
मोदींच्या शेतकरी कायद्यास विरोध करणारे  दलालांचे दलाल म्हणणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी सदर कायद्याने गोव्याचे ९ कोटी नुकसान होणार असल्याचे सांगुन सदर कायदा शेतकरी विरोधी असल्याची प्रतिक्रीया देणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे  दलाल असल्याचे मान्य केले आहे असा टोमणा  चोडणकर यांनी मारला.
 मुख्यमंत्री  प्रमोद सावंत हे राज्यकारभार चालविण्यास असमर्थ व अकार्यक्षम असल्याचे काॅंग्रेस पक्षाने अनेक वेळा उघड केले आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना खोटारडा म्हटले होते. गोव्याच्या लोकायुक्तांनी त्यांच्या सरकारला भ्रष्टाचाराची अनेक  प्रशस्तीपत्रे दिली आहेत,असे सांगून चोडणकर म्हणाले,केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आई म्हादईचा सौदा केला तसेच भाजप सरकारचे सर्व मंत्री व पदाधिकारी यांना मोदींच्या क्रोनी कॅपिटालीस्ट मित्रांकडुन मलई मिळत असल्यानेच ते सर्वजण कोळसा वाहतुक व मोले अभयारण्य यावर बोलत नाहीत याचा आम्ही पुर्नउच्चार करतो.