अंधमुक्त गोव्याच्या दिशेने वाटचाल:डॉ. कृष्णप्रसाद 

0
435
गोवा खबर: मातृभूमि सेवा प्रतिष्ठानतर्फे 15व्या शस्त्रक्रिया शिबिराचे तसेच सल्ला व औषधोपचार वितरणाला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला आहे. प्रतिष्ठानतर्फे गोव्यातील कोणीही उडपीला प्रसाद नेत्रालयात भरती झाल्यास त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  ‘अंधमुक्त गोवा’च्या दिशेने जाण्यासाठी आमचा खारीचा वाटा असल्याचे उडपीच्या शासकीय दृष्टी समितीचे अध्यक्ष तथा  प्रसाद नेत्रालय, उडुपीचे कर्नाटकचे वैद्यकीय संचालक डॉ. कृष्णप्रसाद यांनी सांगितले .
दयानंद हायस्कूल- चोडणच्या   सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त चोडण शैक्षणिक संस्था-चोडण, मातृभूमि सेवा प्रतिष्ठान- गोवा आणि प्रसाद नेत्रालय -उडुपी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 8 मार्च 2020 रोजी 15व्या मोफत  शस्त्रक्रिया शिबिराचे तसेच सल्ला व औषधोपचार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुरा बाळे  म्हणाल्या, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरूणपण आणि वार्धक्य असे तीन काळ येतात. आपल्या आधूनिक जीवनशैलीमुळे आजकाल लहान कोवळ्या वयातच चष्मा लागतो. मुले व्यायाम वा खेळण्याऐवजी मोबायलवर अधिक वेळ घालवत असतात. वातनाकुलीन खोल्यात बसून बैठे काम करण्याच्या आणि फास्टफुड खाण्याच्या सवयीमूळे अनेक व्याधी जडत असतात.
गोव्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक तसेच  होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सरकारकडून मोफत उपचार आणि औषधेही पुरवली जात असून त्याचा जनतेने लाभ घ्यावा , असे आवाहन मये आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. विभा बर्वे यांनी केले.
 मातृभूमि सेवा प्रतिष्ठानाचे सरचिटणीस  सुरज नाईक म्हणाले, की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज 15वे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरातून सुमारे 800 लोकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले असून सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाले आहेत. आजच्या शिबीरातही निवडण्यात आलेल्या रुग्णांना उडपी येथे संस्थेतर्फे शस्त्रक्रिया करण्यास नेण्यात येऊन दोन दिवसात त्यांना परत घरी जाण्यास मिळणार आहे.  यापुढील शिबीर 24 एप्रिल रोजी साखळी येथील रविंद्र भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.
चोडण येथे आयोजित मोफत आयुर्वेदिक तपासणीसाठी 218 जणांनी सहभाग घेतला असून 630 जणांची नेत्र तपासणी  करण्यात आली.   निवडलेल्या 254 गरजू रूग्णांना मोफत चष्मा पुढच्या तारखेला देण्यात येणार आहे. शिबीराच्या दिवशीच 48 जणांना   शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले असून त्यातील 18 रूग्णांनी कॅम्पच्या दिवशीच शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांसोबत उडपीला रुग्णालयात पाठवण्यात आले असून उर्वरीत जणांवर नंतर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक , मये मतदारसंघाचे आमदार प्रविण झाट्ये, चोडण शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे आदी मान्यवरांनी  शिबीरातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.