गोवा खबर:गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधणी केलेल्या ‘सजग’ या गस्तीनौकेचे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि श्रीमती विजया नाईक यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. याप्रसंगी संरक्षण उत्पादन निर्मिती विभागाचे सचिव सुभाष चंद्र, तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन, गोवा विभागाचे फ्लॅग ऑफीसर रिअर ऍडमिरल फिलीपोज प्युनोमुटील, गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक कमोडोर (निवृत्त) बी बी नागपाल यांची उपस्थिती होती.
स्वदेशी तंत्रज्ञानाने अतिशय कमी कालावधीत नौकेची बांधणी ही देशासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. ही नौका गस्तीबरोबरच बचाव आणि मदतकार्यासाठी उपयोगी असणार आहे. गोवा शिपयार्डने मुदतीच्या आत तटरक्षक दलासाठी नौका उपलब्ध करुन दिल्याबद्दल नाईक यांनी गोवा शिपयार्डचे कौतुक केले. भारतीय तटरक्षक दलाकडून गोवा शिपयार्डला मिळालेले हे सर्वात मोठे कंत्राट आहे.
गोवा शिपयार्ड भारतीय तटरक्षक दलासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 05 गस्तीनौकांची बांधणी करणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते 13 नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आला होता.
Addressing at the Launching Ceremony of 3rd Vessel of 05 CGOPV Project -YD 1235 at Goa pic.twitter.com/MyrtcKwNmF
— Shripad Y. Naik (@shripadynaik) November 14, 2019
भारतीय तटरक्षक दलाला विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा या हेतूने गस्तीनौकेची बांधणी करण्यात आली आहे. संगणक आधारीत प्रणालीच्या माध्यमातून नियंत्रण व्यवस्था असलेली ही तटरक्षक दलासाठीची सर्वात अत्याधुनिक नौका असणार आहे. 2400 टन वजनाच्या नौकेवर चाचेगिरीला आळा घालण्यासाठी जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे.